म्हापसा : छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास, शंभाजी महाराज व जिजाऊ माता यांनी जो हिंदवी स्वराज्य स्थापनेसाठी संघर्ष केला. याची सविस्तर माहिती युवा पिढीपर्यंत पोचविण्यासाठी ‘इथे ओशाळला मृत्यू’ नाटक बघितले पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज व शंभाजी राजे स्वराज्यासाठी कसे झटले हा शिवकालीन इतिहास या नाटकातून दाखविला आहे, असे प्रतिपादन कला व संस्कृतीमंत्री गोविंद गावडे यांनी केले. गोमंतक बहुजन महासंघ आयोजित वेषभूषाकार, नेपथ्यकार तथा मूर्तीकार कै. भालचंद्र नाटेकर, कै. यशवंत नाटेकर व कै. माऊती नाटेकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ येथील हनुमान नाट्यागृहात नाट्या महोत्सवाचे समई प्रज्वलित करून उद्घाटन केल्यावर मंत्री गावडे बोलत होते. यावेळी समाजाचे अध्यक्ष अनिल होबळे, समितीचे पदाधिकारी विश्वनाथ हळर्णकर, जयंत नाटेकर व्यासपीठावर उपस्थित होते. आज गोमंतक महासंघ अनेक जाती जमातीना महासंघात घेऊन त्यांच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न करीत आहे. घटनात्मक हक्क मिळवून देण्यासाठी हा संघ कार्य करीत आहे. युवकांना पुढे नेण्यासाठी हा महासंघ प्रयत्न करीत आहे. या गोव्याला हवी ती कामे मंत्री श्रीपाद भाऊनी करून दिली आहेत. असे नेते महासंघाकडे जुळतात तेव्हा अशा घटकांचा उद्धार होतो, असे मंत्री गावडे म्हणाले. यावेळी कला व संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांचा केंद्रीयमंत्री श्रीपाद नाईक यांच्याहस्ते शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. तसेच यावेळी बहुजन समाजाचे अर्जुन जाधव (पेडणे), अॅड. जयप्रकाश नाईक, श्रीप्रसाद वळवईकर यांचा मंत्री नाईक यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. अनिल होबळे यांनी मानले.
सर्व समाज एकसंघ हवेत : श्रीपाद नाईक
बहुजन महासंघ अनेक वर्ष उत्तमरित्या काम करीत असून नाटक हे सर्वांचे मूळ आहे. सर्वांचा त्याग असतो तेव्हा कुटुंब चांगले घडते. आज येथे सत्कार केलेल्या लोकांनी समाजासाठी मोठा त्याग केलेला आहे. ज्याप्रमाणे समईतील सर्व वाती एकत्र केल्या तेव्हा त्याचा प्रकाशही मोठा झाला. सर्व एकत्र आले तर केवढाही वारा आला तर ती वात कुणीही बुझवू शकणार नाही. तुम्ही कुठल्याही समाजाचे असाल जर सर्व एकत्रित आले तर समाजाचे कार्य बळकट होईल. या देशाचे मंदिर घट्ट, मजबूत करायचे असेल तर सर्व समाज एकसंघ असायला हवेत, असे केंद्रीयमंत्री श्रीपाद नाईक म्हणाले.









