नववी ते बारावीची पुस्तके बाजारात उपलब्ध
पणजी : नववी ते बारावीची सर्व पुस्तके बाजारात उपलब्ध असल्याची माहिती गोवा बोर्डाचे अध्यक्ष भगीरथ शेट्यो यांनी दिली. कुंकळ्ळी बंडाचा इतिहास अकरावीच्या नवीन इतिहास पुस्तकात समाविष्ट करण्यात आला असून ते देखील बाजारात आल्याचे त्यांनी नमूद केले. ते म्हणाले की, नववी ते बारावी इयत्तेची सर्व पुस्तके बोर्डातर्फे दिली जातात. परंतु ती मोफत नाहीत तर ती दुकानातून घ्यावी लागतात. ही पुस्तके मे, एप्रिल महिन्यातच पुस्तक विक्रत्यांकडे बोर्डातर्फे विक्रीला देण्यात येतात. अकरावीचे इतिहास पुस्तक यापूर्वी बाजारात नव्हते. कारण त्यात कुंकळ्ळीचा बंडाचा इतिहास समाविष्ट करायचा होता म्हणून त्या पुस्तकास थोडा उशीर झाला असून ते आता विक्रेत्यांकडे उपलब्ध झाल्याचे त्यांनी नमूद केले. त्यात गोव्याचे चार नवे इतिहास समाविष्ट करण्यात आले आहेत. आता बारावीची पुरवणी परीक्षा चालू असून त्याचा निकाल सोमवारपर्यंत लागेल. दि. 20 जूनपासून दहावीची पुरवणी परीक्षा होणार आहे. त्यांचा निकाल जुलैच्या पहिल्या आठवड्यात होणार आहे. त्यात पास होणाऱ्यांना प्रवेश देण्यासाठी बोर्डाने विनंती केली असून तशी काळजी घेण्यात येणार आहे.









