एकेकाळी खरेदीसाठी व्हायची झुंबड, आता अत्यल्प वापर, जागा घेतली प्लास्टिकने
प्रतिनिधी /काणकोण
शेतकऱयांचा पावसापासून बचाव करणारी आणि थंडीपासून संरक्षण देणारी ‘कांबळ’ आजच्या काळात इतिहासजमा होत आली असली, तरी चावडी-काणकोण येथील यशवंत क्लोथ स्टोअर्सचे मालक अजित पै यांनी मात्र आपल्या कपडय़ांच्या दुकानात कांबळ उपलब्ध करणे अजूनही कायम ठेवले आहे.
यशवंत क्लोथ स्टोअर हे दुकान पोर्तुगीज काळापासून कपडय़ांचा व्यापार करत आलेले असून सध्या त्यांची चौथी पिढी या ठिकाणी कार्यरत आहे. शेतीप्रधान अशा काणकोण तालुक्यात यापूर्वी मोठय़ा प्रमाणात कांबळ वापरली जायची व त्यांचा व्यापार चालायचा. एकटय़ा यशवंत क्लोथ स्टोअर्समध्ये वर्षाला पावसाळी हंगामात किमान एक हजार इतक्या कांबळ विकल्या जायच्या. त्याशिवाय महालक्ष्मी क्लोथ स्टोअर्स, नाईक क्लोथ स्टोअर्समध्ये देखील पावसाळय़ात कांबळ खरेदीसाठी गर्दी व्हायची. खोतीगाव, गावडोंगरी, लोलये, पोळे या भागांतील लोक माजाळी, नंदनगद्दा या ठिकाणी जाऊन कांबळ आणायचे. हळूहळू ही जागा प्लास्टिकने घेतली आणि कांबळ वापरण्याकडे शेतकऱयांनी पाठ फिरविली.
जून महिन्यात शेतीच्या कामाला प्रारंभ झाल्यानंतर कांबळ खरेदीसाठी शेतकऱयांची झुब्ंाड उडायची, अशी माहिती अजित पै यांनी दिली. आपण साधारणपणे 50 ते 100 रुपयांना यापूर्वी कांबळ विकलेली आहे. सध्याची किंमत 1000 ते 1500 रु. इतकी झाली आहे. सध्या आपण 100 ते 200 इतक्या कांबळ आणतो आणि काही शेतकरी अजूनही कांबळ शोधत येतात. विशेष म्हणजे या भागात येणारे काही परदेशी नागरिक आवर्जुन कांबळ खरेदी करतात, असे त्यांनी सांगितले.
या तालुक्यातील शेतकऱयांच्या घरांत पूर्वी शेकोटी असायची. शेतीची कामे उरकून आल्यानंतर भिजलेली कांबळ वाळविण्यासाठी या शेकोटीचा वापर व्हायचा. त्याशिवाय काही जण न्हाणीघराचा वापर कांबळ वाळविण्यासाठी करायचे. हीच कांबळ काही जण रात्रीच्या वेळी पांघरूण म्हणून वापरायचे. आता सर्वच बदलले आहे. शेतीची कामे मोजक्याच ठिकाणी होतात. ती देखील यांत्रिकी पद्धतीने केली जातात. शेकोटीची परंपरा नष्ट झाली आहे. कांबळ वापरणे बंद झाले. ही जागा प्लास्टिकने घेतली आहे. तरीही आपली जुनी परंपरा टिकावी म्हणून आपण दरवर्षी कांबळ विकतो. मोजकेच शेतकरी कांबळ विकत घ्यायला आपल्याकडे येत असतात, असे पै यांनी सांगितले.









