साहसिक कृत्ये करण्याचा छंद अनेकांना आहे. असे लोक नेहमीच अद्भूत स्थानांच्या शोधात असतात. ते सर्वसामान्यांसारखे चित्रपट पाहणे, हॉटेलांमध्ये खाणे, किंवा मॉलमध्ये खरेदी करणे, अशा बाबींमध्ये समाधान मानत नाहीत. ते अशी स्थाने शोधतात की. जेथे जाणे सर्वसामान्यांना सुचणारही नाही. सुचले तरी तेथे जाण्याचे धाडस त्यांना होणार नाही. सध्या लेक्सी एल्फोर्ड नामक अशाच एका साहसी तरुणीची चर्चा सर्वत्र होत आह. तिच्या साहसाच्या आवडीतून व्हिएतनाम युद्धातील महत्वाच्या ऐतिसासिक स्थानाला आणि घटनेला उजाळा मिळाला आहे.
ही युवती जगातील सर्व देशांचे पर्यटन केलेली सर्वात कमी वयाची महिला आहे. तिने नुकताच व्हिएतनाम या देशाचा दौरा केला होता. व्हिएतनाम हा देश 1960 च्या दशकात एका मोठ्या युद्धाने ग्रासला होता. हे युद्ध जवळपास 15 वर्षे अखंडपणे चालले होते. अखेर व्हिएतनामचे दोन तुकडे होण्यात या युद्धाची परिणती झाली होती. अलिकडच्या काळातील ते सर्वात जास्त लांबलेले युद्ध म्हणून प्रसिद्ध आहे. अशा व्हिएतनाममध्ये ही युवती पोहचल्यानंतर तिने तिच्या स्वभावानुसार सर्वसामान्य पर्यटक जी स्थळे पाहतात ती टाळून या देशातील वनप्रदेश धुंडाळण्यास प्रारंभ केला. अशाच एक वनप्रदेशात तिला एक गुप्त भुयार आढळले. उत्सुकतेपोटी तिने त्या भुयारावरचे झाकण उघडले आणि ती आत शिरली. खरे तर असे करणे हा मूर्खपणाच होता. कारण अनोळखी स्थानी अशा कधीही न पाहिलेल्या निर्मनुष्य भुयारात शिरणे म्हणजे संकटाला आमंत्रण देण्यासारखेच होते. तथापि, तिच्या या साहसामुळे एक ऐतिहासिक स्थान पुन्हा प्रकाशात येणार होते. व्हिएतनाम युद्धात सैनिक या भुयाराचा उपयोग स्वत:च्या बचावासाठी आणि शत्रूच्या दृष्टीपासून स्वत:ला लपविण्यासाठी करत होते.
हे भुयार बरेच लांब आहे. ते व्हिएतनाममधील चिन मिन शहराजवळ असून त्याचे नाव त्यावेळी कू ची भुयार असे प्रचलित होते. त्या युद्धाच्या काळात या भुयारात अनेक सैनिक अनेक आठवड्यांपर्यंत वास्तव्यास असत. हे भुयार सहजासहजी शत्रूच्या सैनिकांच्या दृष्टीस पडत नसे. त्यामुळे गनिमी कावा प्रकारच्या युद्धात याचा मोठा उपयोग होत होता. या भुयाराच्या परिसरात शत्रूच्या सैनिकांना अडकविण्यासाठी अनेक फास किंवा ट्रॅप्स लावण्यात आले होते. मात्र, युद्धानंतर अनेक दशके या भुयारात कोणाचाही वावर नसल्याने आणि ते विस्मरणात गेल्याने त्याची अवस्था अत्यंत वाईट झालेली होती. या युवतीने या भुयाराच्या आतील भागाचे व्हिडीओ चित्रण करुन ते प्रसिद्ध केले आहे. व्हिएतनाममधील अनेकांनाही या भुयाराची माहिती नव्हती. तिच्या व्हिडीओमुळे हे ऐतिहासिक भुयार पुन्हा प्रकाशात आले आहे, अशी प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केलेली आहे









