तपोभूमीवर पाच हजारांहून अधिक जणांचा श्रावणीविधी : ऐतिहासिक घटनेचे साक्षीदार होण्यास लोटला जनसागर,एशिया बुक ऑफ रिकॉर्डमध्ये झाली नोंद,
महेश गावकर /फोंडा
गोव्याची ‘भोगभूमी’ म्हणून झालेली ओळख वेदनादायी आहे. गोवा ही साक्षात तपोभूमी, योगभूमी, परशुराम भूमी आहे. भारताची ‘दक्षिण काशी’ हे तीर्थक्षेत्र अशी गोव्याची ओळख पुन्हा निर्माण करण्यासाठी सर्वांनी अध्यात्माकडे वळावे. कुंडई तपोभूमीवर श्रावणविधी सोहळयात एकाचवेळी सुमारे 5 हजाराहून अधिक भक्तगणांनी ‘यज्ञोपवित’ धारण करण्याच्या विधीची एशिया बुक ऑफ रेकॉर्ड व इंडिया बुक व ऑफ रिकॉर्ड या पुस्तकात विक्रमाची नोंदी झाली हा खऱ्या अर्थाने गोव्यातील समस्त हिंदुबांधवांना अभिमानाचा क्षण आहे, असे प्रतिपादन सदगुरू ब्रह्मेशानंदाचार्य स्वामीजी यांनी केले. श्री दत्त पद्नाभ पीठ पीठाधीश्वर, पदमश्री विभूषित, सद्गुरू ब्रह्मेशानंदाचार्य स्वामीजींच्या दिव्य मार्गदर्शनाने गोमंतकाचे ह्य्दय असलेल्या गुरूपीठावर वेदोक्त श्रावणी विधीचे भव्य आयोजन काल बुधवारी नारळी पोर्णिमेच्या दिवशी करण्यात आले. पाच हजारांहून अधिक हिंदु धर्माभिमानी तपोभूमीवर एकत्रित येऊन एकाच ठिकाणी पवित्र यज्ञोपवित धारण केले.
गोव्यातील ऐतिहासिक क्षण
गोव्यातील या ऐतिहासिक क्षणाला इटली रोम येथील सूर्यचंद्र योगाश्रमचे योग महामंडलेश्वर शिवानंद सरस्वती स्वामी, हरिद्वार येथील चेतन ज्योती आश्रमाचे महंत ऋषीश्वरांनंद स्वामी, हरिद्वार येथील अखिल भारतीय आखाडा परिषदेचे प्रवक्ते महंत बाबा हटयोगी स्वामी व भारत साधू समाजाचे संघटनमंत्री योगी आशितोषजी, अयोध्येतील दशरथ महल, जस्टीस धर्मराज मिनाजी तसेच गोव्याचे समाजकल्याणमंत्री सुभाष फळदेसाई यांनी स्वत: या धार्मिक विधीमध्ये सहभाग घेतला. यावेळी पर्यटनमंत्री रोहन खंवटे, कुंभारजुवेचे आमदार राजेश फळदेसाई, डिचोलीचे आमदार डॉ. चंद्रकात शेट्यो, मयेचे आमदार प्रेमेंद्र शेट, फोंड्याचे नगराध्यक्ष रितेश रवी नाईक उपस्थित हेते.
वीस हजार भाविकांची उपस्थिती
पीठाधीश प. पू. ब्रह्मेशानंदाचार्य स्वामीजींच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या उत्सवाला संप्रदायाशी संबंधीत वीस हजार भक्तगणांनी उपस्थिती लावली. आगामी काळात गोव्यातील समुद्रकिनारे तप, योग, हिंदु शास्त्रीय संगीताच्या प्रसारासाठी प्रसिद्ध व्हावेत. देव, ऋषी व पितृ ऋण विधी म्हणजेच श्रावण विधी आहे, येत्या काळात भारताची आध्यत्मिक ओळख दृढ होईल, असे भाकित सद्गुरू ब्रह्मेशानंदाचार्य यांनी केले.
आंतरराष्ट्रीय संत, महंतांचा सहभाग
श्रावणी उत्सवाच्या प्रारंभी सकाळी 10 वा. सद्गुरु पूजन व गोपूजनाने वेद उत्सर्जन विधीने प्रारंभ झाला. 11 वा. तर्पण विधी व 11.45 वा. यज्ञोपवितधारण विधी, दुपारी सभादीप दान, आरत्या, दर्शन व महाप्रसादाने उत्सवाची सांगता झाली.आंतरराष्ट्रीय संत महंतांच्या सानिध्यात श्रावणी विधी संपन्न झाला. गोव्यातील मंदिराची ओळख जगभर प्रसिद्ध आहे, ती ओळख भविष्यातही अबाधित राहण्यासाठी तसेच अध्यात्मिक ज्ञानाचा प्रसार होण्यासाठी तपोभूमीचे कार्य ऐतिहासिक करत आहे.
किरण ठाकुर यांचीही उपस्थिती
तपोभूमीवर श्रावण विधीला हजारोच्या संख्येने भक्तगणांच्या उपस्थित होते. यावेळी दै. तरूण भारतचे समूह प्रमुख तथा सल्लागार संपादक किरण ठाकुर, गोवा आवृत्तीचे संपादक सागर जावडेकर यांनीही श्रावणविधीला उपस्थित राहून स्वामीजींचे आशिर्वाद घेतले.
एशिया बूक ऑफ रेकॉर्डसमध्ये नोंद ऐतिहासिक
हजारो हिंदु एकत्रित येऊन यज्ञोपवित धारण केलेल्या या भव्यदिव्य सोहळयाची नोंद एशिया बुक ऑफ रेकॉर्ड व इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झालेली आहे. या संस्थेतर्फे कुंडई येथील श्री दत्त पद्नाभ पीठ अर्थात तपोभूमीला एकाच वेळी 5 हजाराहून अधिक भक्तांचा श्रावणीविधी यशस्वी केल्याबद्दल दोन्ही पारितोषिके स्वामीजींना प्रदान करण्यात आली. दोन हजारांहून अधिक भक्तांचा सोहळा एकाच स्थळी आयोजनासाठी इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड तर तीन हजारांहून अधिक भक्ताचा सोहळा एकाच स्थळी आयोजनासाठी एशिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद करता येते. या सोहळ्यात दोन्ही विक्रमांची नोंद झाल्याची घोषणा दिल्ली येथून खास या कार्यक्रमाचे परीक्षक म्हणून दाखल झालेले अनंत बिरादर यांनी घोषणा केली. दोन्ही पदके व प्रशस्तीपत्रके ब्रह्मेशानंदाचार्य स्वामीजींना प्रदान करण्यात आली. समस्त हिंदु धर्मियांनी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहून गोमंतकीयांची खरी ओळख, हिंदु धर्माचरणाचे चित्र जगासमोर ठेवले.









