वृत्तसंस्था/ ताश्कंद
येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय मुष्टीयुद्ध संघटनेच्या पुरुषांच्या 2023 च्या विश्व मुष्टीयुद्ध चॅम्पियनशिप स्पर्धेत भारतीय मुष्टीयोद्ध्यांनी ऐतिहासिक कामगिरी करताना तीन कांस्यपदकांची कमाई केली. या स्पर्धेत भारताच्या दीपक कुमार, मोहम्मद हुसामुद्दीन आणि निशांत देव यांनी प्रत्येकी एक कांस्यपदक मिळविले.
या स्पर्धेच्या पदक तक्त्यात भारताने संयुक्त चौथे स्थान पटकाविले. या स्पर्धेमध्ये यजमान उझबेकिस्तानने नऊ पदकांसह पहिले, क्युबा आणि रशिया यांनी प्रत्येकी समान सहा पदकांसह दुसरे तर कझाकस्तानने पाच पदकांसह तिसरे स्थान मिळविले.
या स्पर्धेत शुक्रवारी झालेल्या 51 किलो वजन गटातील उपांत्य लढतीत फ्रान्सच्या बिलाल बेनेमाने भारताच्या आशियाई रौप्यपदक विजेत्या दीपक कुमारचा 4-3 अशा गुणांनी पराभव करत अंतिम फेरी गाठली. या लढतीतील पहिल्या फेरीत दीपकने सावध पवित्रा घेतल्याने तो एका गुणाने मागे पडला होता. शेवट पर्यंत चुरशिच्या या लढतीत फ्रान्सच्या बेनेमाने दीपक कुमारवर केवळ एका गुणाने मात केली. या पराभवामुळे दीपक कुमारला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.
या स्पर्धेतील 71 किलो वजन गटातील उपांत्य फेरीच्या लढतीत विद्यमान आशियाई चॅम्पियन कझाकस्तानचा शामबेरगेनोव्हने भारताच्या निशांत देवचा 5-2 अशा गुणांनी पराभव करत अंतिम फेरीत स्थान मिळविले. त्याचप्रमाणे अन्य एका वजन गटातील उपांत्य फेरीच्या लढतीत भारताच्या हुसामुद्दीनने गुडघ्याला झालेल्या दुखापतीमुळे प्रतिस्पर्ध्याला पुढे चाल दिली. त्यामुळे हुसामुद्दीनला या स्पर्धेत प्रथमच सहभागी होताना कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. विश्व मुष्टीयोद्ध स्पर्धेच्या इतिहासामध्ये आतापर्यंत भारताने 10 पदकांची कमाई केली असून त्यामध्ये दीपक कुमार, मोहम्मद हुसामुद्दीन आणि निशांत देव यांच्या पदकांचा समावेश राहिल. ताश्कंदमदील या स्पर्धेत 107 देशांचे सुमारे 538 स्पर्धक सहभागी झाले होते त्यात अनेक ऑलिंपिक पदक विजेत्यांचा समावेश होता. भारताच्या कांस्यपदक विजेत्या मुष्टीयोद्ध्यांना प्रत्येकी 50 हजार डॉलर्सचे बक्षीस मिळाले.









