वार्ताहर /कडोली
ढोलताशा, सनई चौघडी, डॉल्बीच्या गजरात आणि ‘हर हर महादेव’ च्या जयघोषात कडोली येथील जागृत देवस्थान श्री कलमेश्वर देवालयाचा ऐतिहासिक दसरोत्सव शिस्तबद्धरितीने अपूर्व उत्साहात आणि शांततेत पार पडला. यावेळी तरुणाईचा जोश पाहून पोलीसही थिरकले. म्हैसूरपाठोपाठ कडोली येथील दसरोत्सवाची वैविधता, जोश आणि गावातील सजावट पाहून समस्त भाविकांना याची प्रचिती मंगळवारी पहायला मिळाली. बेळगाव परिसर, चंदगड, खानापूर तालुक्यातील तरुणाई हजारोंच्या संख्येने कडोलीत एकवटली होती. तब्बल नऊ तास डॉल्बीवर ठेका धरून नाचत तरुणाईने आपली हौस पूर्ण करवून घेतली. तसेच ढोलताशा आणि सनई चौघडीच्या आवाजात गुलालाची उधळण करीत बैलांची मिरवणूक तितक्याच उत्साहात पार पडली.
पोलीस खात्यानेही सहकार्याची भूमिका घेऊन समस्त भाविकांना दसरोत्सव आनंदात आणि उत्साहात साजरा करण्यास मुभा दिल्याने समाधान व्यक्त होत होते. जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांचे चिरंजीव युवानेते राहुल जारकीहोळी यांच्याहस्ते श्रीफळ वाढवून मिरवणुकीचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी केपीसीसी सदस्य मलगौडा पाटील, ग्रा. पं. अध्यक्ष सागर पाटील, ग्रा. पं. सदस्य उपस्थित होते. सकाळी काकड आरती, कळसारोहणानंतर यात्रोत्सवाला सुरुवात झाली. सकाळपासून दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती. मंदिरात केळीच्या झाडांची आकर्षक बन्नी बांधण्यात आली होती. सायंकाळी हक्कदारांच्या वतीने धार्मिक विधी पार पडल्यानंतर देवाच्या पालख्या सोने लुटण्यासाठी सीमेवर नेण्यात आल्या. त्या ठिकाणी सोने लुटल्यानंतर यात्रोत्सवाची सांगता झाली. यावेळी पोलीस निरीक्षक विजयकुमार शिन्नूर, पोलीस उपनिरीक्षक मंजुनाथ आणि सहकाऱ्यांनी कडक पोलीस बंदोबस्त ठेवला होता.