भारताच्या शेतकऱ्यांना लाभ होणार, मुक्त व्यापार करारावर पंतप्रधान मोदी आणि स्टार्मर यांच्या स्वाक्षऱ्या
वृत्तसंस्था/लंडन
भारत आणि ब्रिटन यांच्यात ऐतिहासिक मुक्त व्यापार करार करण्यात आला आहे. गुरुवारी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ब्रिटनचे नेते कीर स्टार्मर यांनी या करारावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. या करारामुळे भारताच्या शेतकऱ्यांचा लाभ होण्याची शक्यता आहे. कारण भारताच्या कृषी आणि दुग्धोत्पादनाना ब्रिटनने आपली बाजारपेठ मोकळी करुन दिली आहे. भारतानेही ब्रिटनच्या काही उत्पादनांवरील करांमध्ये मोठी कपात करण्याची घोषणा केली आहे. तथापि, हा करार त्वरित लागू होणार नाही. त्याला ब्रिटनच्या संसदेची मान्यता मिळणे आवश्यक आहे. ती औपचारिकता पूर्ण होण्यासाठी काही काळ लागणार आहे.
दोन्ही देशांमध्ये असा करार करण्यासंबंधी चर्चा गेल्या दोन दशकांपासून केली जात आहे. तथापि, गेल्या काही महिन्यांमध्ये या चर्चेने निर्णायक आकार घेतला. त्यानंतर हा करार अस्तित्वात आला आहे. दोन्ही देशांमधील उद्योग क्षेत्रांनी या कराराचे स्वागत केले आहे. सध्या दोन्ही देशांमधील परस्पर व्यापार 60 अब्ज डॉलर्सइतका आहे. येत्या पाच वर्षांमध्ये तो 120 अब्ज डॉलर्सवर नेण्याचे दोन्ही देशांचे ध्येय आहे. ते साध्य करण्यासाठी हा करार महत्त्वाचा ठरणार आहे.
श्रमकेंद्रीत वस्तू करमुक्त
भारतामध्ये श्रमकेंद्रीत (लेबर इन्टेन्सिव्ह) वस्तूंचे उत्पादन मोठ्या प्रमाणात केले जाते. या वस्तूंना आता ब्रिटनची बाजारपेठ या करारामुळे मोकळी झाली आहे. अशा वस्तूंवर ब्रिटनमध्ये शून्य कर लावला जाईल. त्यामुळे चामड्याच्या वस्तू, पैलू पाडलेले हीरे, हस्तकौशल्याच्या वस्तू, वस्त्रप्रावरणे, विणकामातून बनलेल्या वस्तू, पादत्राणे आणि इतर तत्सम वस्तू यांचा खप ब्रिटनच्या बाजारपेठेत वाढण्याची शक्यता आहे. याचा लाभ भारतातील असंख्य कारागिरांना होणार आहे.
ब्रिटिश व्हिस्की स्वस्त
भारताने ब्रिटनमधून आयात होणाऱ्या व्हिस्कीवरील कर 150 टक्क्यांवरुन 75 टक्के करण्याचा निर्णय घेतला आहे. भविष्यकाळात हा कर 40 टक्क्यांवर आणला जाणार आहे. तसेच ब्रिटनची चॉकलेटस् आणि मोटारी यांच्यावरील करांमध्येही मोठी कपात करण्यात आली आहे. त्यामुळे ब्रिटनची जगप्रसिद्ध व्हिस्की आता भारतात पूर्वीपेक्षा स्वस्तात मिळू शकणार आहे. ब्रिटनच्या आणखी काही उच्च तंत्रज्ञानविषयक वस्तू भारतात स्पर्धात्मक किमतीत मिळू शकणार आहेत.
मान्यता आवश्यक
करार झाला असला तरी त्याचे कार्यान्वयन होण्यासाठी त्याला ब्रिटनच्या संसदेची मान्यता मिळणे आवश्यक आहे. ही आता केवळ एक औपचारिकता असली, तरी ती पूर्ण होण्यासाठी 1 वर्षपर्यंतचा कालावधी लागू शकतो. ही मान्यता लवकरात लवकर मिळेल, या दृष्टीने प्रयत्न केला जाईल, असे ब्रिटनकडून स्पष्ट करण्यात आले असून तशा हालचाली करण्यात येत असल्याचे समजते.
कृषीक्षेत्रात आनंद
या करारासंबंधी भारताच्या कृषी क्षेत्रातील तज्ञांनी समाधान व्यक्त केले आहे. भारतातून प्रत्येक वर्षी 36.63 अब्ज डॉलर्सचा कृषी माल निर्यात केला जातो. तर ब्रिटनमध्ये दरवर्षी जगभरातून 37.52 अब्ज डॉलर्सचा कृषीमाल आयात केला जातो. ब्रिटनच्या या आयातीत भारताच्या कृषीक्षेत्राचा वाटा केवळ 81 कोटी डॉलर्सचा, म्हणजेच केवळ 2.2 टक्के इतकाच आहे. आता भारतीय कृषीमालाच्या किमती ब्रिटनमध्ये कमी होणार असल्याने हा वाटा वाढून 15 टक्क्यांपर्यंत पोहचू शकतो, असे तज्ञांचे मत आहे. या बाजारपेठेत आता भारताच्या कृषी वस्तू स्पर्धात्मक किमतीत मिळू शकणार असल्याने आपल्या शेतकऱ्यांचा लाभ होण्याची शक्यता आहे. मात्र, त्यासाठी ब्रिटनच्या कृषी बाजारपेठेचा कल समजून घेण्याची आवश्यकता आपल्या शेतकऱ्यांना पडणार असल्याचे काही तज्ञांचे म्हणणे आहे.
या कराराची महत्त्वाची वेशिष्ट्यो
ब्रिटनकडून भारताचा लाभ…
- भारतातून ब्रिटनमध्ये निर्यात होणाऱ्या 99 टक्के वस्तू करमुक्त होणार. त्यामुळे ब्रिटनला होणारी भारताची निर्यात वाढण्याची मोठी शक्यता आहे.
- भारताच्या कृषी उत्पादनांना ब्रिटनची बाजारपेठ मोकळी विनाकर मोकळी होणार. सध्या केवळ 2.2 टक्के असणारी भारताची निर्यात वेगाने वाढणार.
- भारताच्या हस्तकौशल्य प्रधान वस्तू अधिक मोठ्या प्रमाणात ब्रिटनला जाण्याची शक्यता. पैलू पाडलेल्या हिऱ्यांची उलाढालही वाढण्याची शक्यता.
- चामड्याच्या वस्तू, पादत्राणे, रेशमी आणि सुती वस्त्रे, आभूषणे, शोभेच्या वस्तू, श्रमकेंद्रीत (लेबर इन्टेसिव्ह) उत्पादनांना ब्रिटनची बाजारपेठ मोकळी होणार.
- भारताच्या सेवाक्षेत्राला लाभ होणार. भारताकडून अनेक सेवा ब्रिटनला पुरविल्या जातात. त्या स्वस्त होणार असल्याने सेवाक्षेत्र तेथे विस्तारणे शक्य.
- भारतातील तंत्रज्ञ, विद्यार्थी, कौशल्यवान युवक सहजगत्या आणि सुलभपणे ब्रिटनमध्ये रोजगार मिळवू शकतील. उच्च तंत्रज्ञानही हस्तांतरीत होणे शक्य.
भारताकडून ब्रिटनचा लाभ…
- ब्रिटनची व्हिस्की, भारतात आतापेक्षा अधिक स्वस्त होणार. इतर ब्रिटीश मद्ये आणि उच्चतांत्रिक वस्तू भारतात मोठ्या प्रमाणावर आयात झाल्याने लाभ.
- ब्रिटीश कार्सही भारताच्या बाजारपेठेत उतरणार. त्यांच्यावरील कर बराच कमी केल्याने या कार्स इतर देशांच्या भारतात येणाऱ्या कार्सपेक्षा स्वस्त होणे शक्य.
- ब्रिटन उत्पादित रसायने, इलेक्ट्रॉनिक साधने आणि उच्च तंत्रज्ञान आधारित वस्तू भारतात स्वस्त होणार असल्याने भारतीयांना आणखी एक पर्याय शक्य.
- भारतात केंद्र सरकार किंवा राज्य सरकारे ब्रिटनमध्ये उत्पादित झालेल्या वस्तूंची खरेदी (प्रोक्युअरमेंट) करु शकणार. त्यामुळे त्याच्या निर्यातीत वाढ.
- संरक्षण, अवकाश संशोधन, संगणक, माहिती तंत्रज्ञान आदी क्षेsत्रात ब्रिटनचे भारताला अधिक प्रमाणात साहाय्य होणे शक्य. परिणामी ब्रिटिश निर्यात वृद्धी.
- उच्च गुणवत्तेची इंजिनिअरिंग उत्पादने भारत आयात करणार. सध्या ही उत्पादने अन्य देशांकडून घेतली जातात. त्यासाठी ब्रिटनचा पर्याय उपलब्ध.









