कंपनीची चौथ्या तिमाहीतील कामगिरी
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
भारतातील सर्वात मोठी दुचाकी कंपनी हिरो मोटोकॉर्पने मंगळवारी चौथ्या तिमाहीतील (जानेवारी-मार्च 2025) निकाल जाहीर केले आहेत. यामध्ये कंपनीने उत्कृष्ट कामगिरी केली आणि वार्षिक आधारावर 6 टक्क्यांच्या वाढीसह 1,081 कोटी रुपयांचा स्वतंत्र निव्वळ नफा मिळविला आहे. यासोबतच, कंपनीचा ऑपरेशनल महसूल 4 टक्क्यांच्या वाढीसह 9,519 कोटी रुपये झाला.
यासोबतच, हिरो मोटोकॉर्पच्या मंडळाने भागधारकांना प्रति समभाग 65 रुपये अंतिम लाभांश देण्याची शिफारस केली आहे. कंपनीच्या आगामी वार्षिक सर्वसाधारण सभेत (एजीएम) भागधारकांच्या मंजुरीनंतर 30 दिवसांच्या आत ते वितरित केले जाणार असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे.
तिमाहीत कंपनीचा ईबीआयटीडीए 4 टक्क्यांनी वाढून 1,416 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. याच वेळी, करपूर्व नफा देखील 7 टक्क्यांनी वाढला, जो 1,442 कोटी रुपये होता. संपूर्ण वर्षासाठी (आर्थिक वर्ष 25), कंपनीने 40,756 कोटी रुपये इतका सर्वाधिक महसूल आणि 4,610 कोटी रुपये नफा नोंदवला.
प्रीमियम आणि ईव्ही विभागांवर भर
हिरो मोटोकॉर्पने आर्थिक वर्ष 25 मध्ये प्रीमियम, स्कूटर आणि इलेक्ट्रिक वाहन विभागांमध्ये चांगली कामगिरी केली. कंपनीने एक्सट्रीम 250 आर एक्सप्लस 210 आणि एक्सट्रीम 160 आर 2 व्ही (2024 आवृत्ती) सारखे प्रीमियम मॉडेल लाँच केले.
हिरोने भारतातील आपले प्रीमियम रिटेल नेटवर्क आणखी मजबूत केले आणि नवीन जागतिक बाजारपेठांमध्ये प्रवेश केला. कार्यवाहक सीईओ विक्रम एस. कसबेकर म्हणाले, ‘आमच्या नवीन प्रीमियम आणि स्कूटर श्रेणीला ग्राहकांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. 125 सीसी विभाग आणि आगामी ईव्ही लाँच आम्हाला आणखी मजबूत करेल.’









