‘क्या करु राम मुझे बुढ्ढा मिल गया’ हे हिंदी चित्रपटातील जुने गाणे अद्यापही कित्येकांच्या लक्षात आहे. पण एखाद्या महिलेने एखादा बुढ्ढा, अर्थात वृद्ध मनुष्य स्वत:ची करमणुकीसाठी किंवा अधिक सभ्य भाषेत ‘कंपॅनियनशिप’साठी घेतला असेल तर तो चर्चेचा विषय होणार हे निश्चित असते. अलिकडच्या काळात एकाकी राहणाऱ्या पुरुषांची आणि महिलांची संख्या वाढली आहे. काही वादांमुळे किंवा न पटल्याने अशा व्यक्ती आपल्या कुटुंबापासून वेगळे राहणे स्वीकारतात. मात्र, कालांतराने याचा एकटेपणाचा त्यांना त्रास होऊ लागतो. पण तोपर्यंत कुटुंबाशी कलह वाढलेला असतो. त्यामुळे तेथे परत जाण्याचा मार्ग बंद असतो.
मग अशा व्यक्ती तात्पुरते सहकारी शोधू लागतात. जवळ पैसा भरपूर असेल तर असे सहकारी किंवा कंपॅनियन्स मिळणे कठीण नसते. समृद्ध देशांमध्ये असे सहकारी भाड्याने पुरविणाऱ्या कंपन्याही असतात. अमेरिकेतील लेखिका आयझा मिरॉक यांनी त्या जपानला गेल्या असताना अशा एका जपानी कंपनीकडून एक वृद्ध ‘कंपनी’ देण्यासाठी अशा कंपनीकडून भाड्याने घेतला होता. त्यांनी स्वत:चे ही माहिती सोशल मिडियावर पोस्ट केली आहे. काजुशी साकुराई असे या वृद्धाचे नाव होते. त्याची निवड मिरॉक यांनी अशा तीन चार वृद्धांमधून स्वत: केली होती. या वृद्धाचे भाडेही भक्कम होते. त्याला एका तासाला 500 रुपये भाडे द्यावे लागत असे. याचा अर्थ दिवसाचे 12 हजार रुपये असा होतो. या लेखिका धनिक असल्याने त्यांना हा दर परवडला होता. जपानच नव्हे, तर आर्थिकदृष्ट्या समृद्ध अशा अनेक देशांमध्ये अशी सेवा पुरविणाऱ्या कंपन्या असतात. या कंपन्या प्रामुख्याने प्रौढ आणि वृद्ध पुरुष किंवा महिला सहकाऱ्यांचा पुरवठा करतात. तसे करणे सुरक्षित असते, असे त्यांचे म्हणणे आहे. आवश्यकतेनुसार पुरवठा करणे हेच तर व्यापाराचे सर्वात प्रमुख तत्व असते, हे अशा सेवांवरुन स्पष्ट होते.









