विशालसिंग चव्हाणसह चौघा जणांविरुद्ध एफआयआर, पोलीस गुन्हेगारांच्या पाठीशी?
बेळगाव ; दहा लाखांच्या खंडणीसाठी सर्वोदय मार्ग हिंदवाडी येथील एका व्यापाऱ्याचे अपहरण करण्यात आले. दि. 1 जून 2023 रोजी ही घटना घडली असून सोमवारी 12 जून रोजी टिळकवाडी पोलीस स्थानकात चौघा जणांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. अद्याप आरोपींना अटक झाली नाही. शशिकांत गुंडू शंकरगौडा (वय 50, रा. हिंदवाडी) या व्यापाऱ्याने दिलेल्या फिर्यादीवरून विशालसिंग चव्हाण (रा. शास्त्राrनगर), विनायक उर्फ विल्लक प्रधान (रा. तिसरा क्रॉस, महाद्वार रोड), महावीर (रा. हुक्केरी) यांच्यासह चौघा जणांविरुद्ध सोमवारी भा.दं.वि. 323, 342, 364 (ए), 384, 504, 506 सहकलम 34 अन्वये एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
1 जून रोजी सकाळी हनुमाननगर येथे 5 गुंठे जागा बघायला जायचे आहे, असे सांगून विशालसिंग व त्याच्या सहकाऱ्यांनी आपल्याला डाक बंगल्याजवळ बोलावून घेतले. तेथून होंडाई क्रिटा कारमधून जागा बघण्यासाठी निघालो. कार हनुमाननगरकडे न नेता बॉक्साईट रोडवर नेण्यात आली. चाकू व इंजेक्शन दाखवून तुला खल्लास करतो, अशी धमकी देण्यात आली, असे शशिकांत यांनी आपल्या फिर्यादीत म्हटले आहे. विशालसिंग कार चालवत होता. कार राष्ट्रीय महामार्गावर नेण्यात आली. वाटेत मारहाण करून धमकावण्यात येत होते. हुक्केरीला पोहोचल्यानंतर तेथे महावीर आला. एका पडक्या घरात कोंडून घालून 10 लाख रुपये दे, नहून तुला व तुझ्या कुटुंबीयाला संपवितो, अशी धमकी देण्यात आली. पैसे दिला नाहीस तर कुटुंबीयांचेही अपहरण करण्याचे धमकाविण्यात आले, असे पोलिसांनी सांगितले. आपल्याजवळ इतके पैसे नाहीत, असे शशिकांतने सांगताच तीन लाख तरी दे, अशी मागणी करण्यात आली. दोन लाख रुपये दिल्याशिवाय तुझी सुटका करणार नाही, असे सांगत 75 हजार रुपये आपल्याकडून काढून घेतले. 2 लाख रुपये देऊन कार घेऊन जा, असे सांगत आपल्याला घरी सोडून त्यांनी आपली कारही पळविल्याचे व्यापाऱ्याने पोलिसांना सांगितले. टिळकवाडी पोलीस याप्रकरणी पुढील तपास करीत आहेत.
दादागिरी वाढली
या घटनेला 15 दिवस पूर्ण व्हायला आले. एफआयआर दाखल होऊन दोन दिवस उलटले तरी विशालसिंग चव्हाण व त्याच्या साथीदारांना अटक झाली नाही. काही अधिकारी या गुन्हेगारांना पाठीशी घालत असल्याची माहिती मिळाली असून त्यामुळेच पुन्हा त्यांची दादागिरी वाढली आहे.









