घटनेनंतर केवळ 12 तासांत मारुतीनगरच्या युवकाला अटक : पोलिसांकडून कसून चौकशी सुरू
बेळगाव : अल्पवयीन मुलीचे अपहरण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या युवकाला अटक करण्यात टिळकवाडी पोलिसांना यश आले आहे. घटनेनंतर केवळ 12 तासांत संशयिताला अटक झाली असून बुधवारी रात्री उशिरापर्यंत त्याची कसून चौकशी करण्यात येत होती. गजानन पाटील (वय 35) मारुतीनगर, सांबरा रोड असे त्याचे नाव आहे. खडेबाजारचे एसीपी अरुणकुमार कोळूर यांच्या मार्गदर्शनाखाली टिळकवाडीचे प्रभारी पोलीस निरीक्षक रामण्णा बिरादार व त्यांच्या सहकाऱ्यांनी गजाननला अटक केली आहे. कायदा व सुव्यवस्था विभागाचे पोलीस उपायुक्त शेखर एच. टी. यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. मंगळवार दि. 11 जुलै रोजी सायंकाळी 6.45 वाजण्याच्या सुमारास शिकवणीला निघालेल्या एका दहावर्षीय बालिकेचे अपहरण करण्याचा प्रयत्न झाला होता. त्या बालिकेने आरडाओरड केल्यामुळे परिसरातील लोक जमा होण्याआधीच गजाननने तेथून पळ काढला होता. हिंदवाडी येथील महावीर गार्डनजवळ घडलेल्या या घटनेनंतर प्रभारी पोलीस आयुक्त विकाशकुमार विकाश यांनी संशयिताच्या शोधासाठी उद्यमबागचे पोलीस निरीक्षक व सध्या टिळकवाडीचे प्रभारी असणारे रामण्णा बिरादार यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथकाची नियुक्ती केली होती. सीसीटीव्ही फुटेज व स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार गजाननला अटक करण्यात आली आहे. अल्पवयीन मुलींचे अपहरण करणारी टोळी कार्यरत आहे की काय? असा संशय निर्माण झाला होता. त्यामुळेच पोलीस दलाने हा प्रकार गांभीर्याने घेतला होता.
रात्री उशिरापर्यंत चौकशी
उपलब्ध माहितीनुसार मारुतीनगर येथील गजानन हा घरात आपल्या आईसोबत राहतो. आई सध्या भावाकडे गेल्यामुळे तो एकटाच असतो. तो अविवाहित आहे. शिकवणीला निघालेल्या अल्पवयीन मुलीचे त्याने अपहरण करण्याचा प्रयत्न केला. सीसीटीव्हीत त्याची छबी कैद झाली असून बुधवारी रात्री उशिरापर्यंत पोलीस अधिकारी त्याची चौकशी करीत होते.









