भ्रष्टाचाराचे आरोप
वृत्तसंस्था/ ढाका
बांगलादेशातील प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ अबुल बरकत यांना शुक्रवारी भ्रष्टाचार प्रकरणात तुरुंगात पाठवण्यात आले. रात्री उशिरा 20 हून अधिक पोलिसांनी बरकत यांच्या घरावर छापा टाकल्यानंतर त्यांना ताब्यात घेण्यात आले. ‘हिंदुत्ववादी अर्थशास्त्रज्ञ’ अशी ओळख असलेले अबुल बरकत यांनी चार दशके ढाका विद्यापीठात अध्यापन केले आहे. पंतप्रधान शेख हसीना यांच्या कारकिर्दीत 2009 मध्ये त्यांना जनता बँकेचे अध्यक्ष बनवण्यात आले होते. अबुल बरकत यांच्यावर त्याच्या कार्यकाळात रेडिमेड गारमेंट कंपनी ‘अॅनोनटेक्स ग्रुप’ ला बेकायदेशीर पद्धतीने कर्ज मिळवून देण्यास मदत केल्याचा आणि जनता बँकेशी संबंधित 2.97 अब्ज टका (सुमारे 225 कोटी रुपये) गंडा घालण्याचा आरोप आहे. बांगलादेश भ्रष्टाचार विरोधी आयोगाने (एसीसी) या प्रकरणात त्यांच्याविरुद्ध खटला दाखल केला होता.
अबुल बरकत हे हिंदू अल्पसंख्याकांच्या बाजूने बोलण्यासाठी ओळखले जातात. त्यांनी कट्टरपंथी इस्लामिक विचारसरणींवर विशेषत: जमात-ए-इस्लामीसारख्या शक्तींवर उघडपणे टीका केली आहे. 2016 मध्ये बरकत यांनी अल्पसंख्याकांवर हल्ले आणि त्यांच्या मालमत्तेवर बेकायदेशीर कब्जा सुरू राहिला तर येत्या 30 वर्षांत बांगलादेशात एकही हिंदू राहणार नाही, असा इशारा दिला होता. त्यांच्या विधानाची बांगलादेशात मोठ्या प्रमाणात चर्चा झाल्यानंतर ते वादग्रस्तही ठरले होते.









