तात्काळ उल्लेख हटविण्याची हिंदू जनजागृती मंचची मागणी
बेळगाव : कर्नाटक राज्य सरकारच्या मागासवर्ग आयोगाकडून सामाजिक आणि शैक्षणिक सर्वेक्षण केले जाणार आहे. परंतु, यामध्ये हिंदू समाजात ख्रिश्चन ही नवी उपजात तयार करण्यात आली आहे. या विरोधात संपूर्ण राज्यभर हिंदू समाजामध्ये तीव्र नाराजी असून हा उल्लेख तात्काळ हटवून सुधारित यादी जाहीर करावी, अशी मागणी हिंदू जनजागृती मंचच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. 22 सप्टेंबरपासून राज्यात जनगणना केली जाणार आहे. परंतु, या जनगणनेमध्ये हिंदू धर्मातील उपजातीमध्ये ख्रिश्चन असा उल्लेख करण्यात आला आहे. अशी कोणत्याही प्रकारची उपजात हिंदू धर्मामध्ये नाही. यामुळे हिंदू समाजामध्ये मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. सर्वेक्षणाच्या अर्जामध्ये ब्राह्मण-खिश्चन, बंजारा-ख्रिश्चन, रेड्डी-ख्रिश्चन, वकलिग-ख्रिश्चन, कुरब-ख्रिश्चन, वाल्मिकी-ख्रिश्चन अशी उपजात जोडण्यात आली आहे. यामुळे सरकारला यातून काय सिद्ध करायचे आहे? असा प्रश्न उपस्थित करण्यात आला.
राज्य सरकारने सामाजिक आणि शैक्षणिक सर्वेक्षण करताना ख्रिश्चन ही उपजात नेमकी कोठून आणली? याचे मुख्यमंत्र्यांनी उत्तर द्यावे. त्याचबरोबर ख्रिश्चन हा उल्लेख टाळून सुधारित यादी जाहीर केल्यानंतरच सर्वेक्षणाला सुरुवात करावी, अशी मागणी करण्यात आली. अप्पर जिल्हाधिकारी विजयकुमार होनकेरी यांनी निवेदन स्वीकारले. त्यापूर्वी गांधी भवन येथे कार्यक्रम घेऊन राज्य सरकारच्या या कृतीचा निषेध करण्यात आला. राज्य सरकारकडून तुष्टीकरणाचे राजकारण सुरू असून ते तात्काळ थांबवण्याची मागणी करण्यात आली. यावेळी माजी विधान परिषद सदस्य महांतेश कवटगीमठ, अॅड. एम. बी. जिरली, महापौर मंगेश पवार, उपमहापौर वाणी जोशी, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष अॅड. अनिल बेनके, अॅड. आर. एस. मुतालिक, श्रीकांत कदम, मुरगेंद्रगौडा पाटील, गीता सुतार, उद्योजक रोहन जुवळी, हनुमंत कोंगाळी यांच्यासह मोठ्या संख्येने हिंदू बांधव उपस्थित होते.









