विरोधकांच्या बैठकीपूर्वी शिवानंद तिवारी यांचे वादग्रस्त वक्तव्य
वृत्तसंस्था /पाटणा
2024 च्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा पराभव कसा करायचा? या एकसूत्री कार्यक्रमासंदर्भात बिहारची राजधानी पाटणा येथे विरोधी पक्षांच्या नेत्यांची मोठी बैठक होत आहे. या बैठकीत उत्तर ते दक्षिण आणि पूर्व ते पश्चिम असे राजकीय नेते सहभागी होत आहेत. या महाआघाडीसाठी नितीशकुमार यांनी पुढाकार घेत एकजुटीसाठी पावले उचलली असतानाच राष्ट्रीय जनता दलाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष शिवानंद तिवारी यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. ‘हिंदूंचा लोकशाहीवर आणि समतेवरही विश्वास उरलेला नाही’ असे म्हणत त्यांनी राजकीय बॉम्ब टाकल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. बिहारच्या राजकारणात ‘बाबा’ म्हणून प्रसिद्ध असलेले शिवानंद तिवारी यांनी नितीश-तेजस्वी यांच्या अडचणी वाढवणारे विधान केले आहे. एका वृत्तवाहिनीशी संवाद साधताना त्यांनी हिंदू समाजाचा समानतेवर विश्वास नाही. यासोबतच हिंदूंचा लोकशाहीवरही विश्वास नाही, असे हिंदू समाजाबाबत वादग्रस्त भाष्य केल्याने वाद निर्माण होणार असल्याचे मानले जात आहे. शिवानंद तिवारी केवळ एका वाक्यावर थांबले नाहीत तर, त्यांनी संवादादरम्यान हिंदू समाज उच्च-नीच आणि भेदभावावर बोलतो. आम्ही पूर्णपणे हिंदू राष्ट्राच्या विरोधात आहोत. तर भाजपला हिंदू राष्ट्र बनवायचे आहे. त्याचबरोबर संविधानाने समानतेचा अधिकार दिला आहे, असेही ते पुढे म्हणाले.









