वयाच्या 85 व्या वर्षी लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
वृत्तसंस्था/ लंडन
हिंदुजा समुहाचे अध्यक्ष गोपीचंद परमानंद हिंदुजा यांचे लंडनच्या एका रुग्णालयात निधन झाले आहे. निधनासमयी ते 85 वर्षांचे होते. उद्योगजगात ‘जीपी’ नावाने प्रसिद्ध गोपीचंद पी. हिंदुजा मागील काही आठवड्यांपासून आजारी होते आणि रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते.गोपीचंद हिंदुजा यांनी मे 2023 मध्ये स्वत:चे ज्येष्ठ बंधू श्रीचंद यांच्या निधनानंतर समुहाच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळली होती. त्यांच्यामागे परिवारात पत्नी सुनीता, पुत्र संजय, धीरज आणि कन्या रीता आहे.
स्वातंत्र्यापूर्वी स्वत:चा व्यावसायिक प्रवास सुरू करणाऱ्या हिंदुजा परिवारात जन्मलेले गोपीचंद यांनी 1959 साली मुंबईत स्वत:च्या परिवाराच्या उद्योगात भाग घेतला. मागील अनेक दशकांमध्ये त्यांनी हिंदुजा समुहाला एक पारंपरिक व्यापारी संचालनापासून बँकिंग, वित्त, ऊर्जा, वाहन, माध्यम आणि पायाभूत क्षेत्रात एक जागतिक औद्योगिक महाशक्तीचे स्वरुप मिळवून देण्यास मदत केली. त्यांच्या नेतृत्वात समुहाने स्वत:चे सर्वात महत्त्वपूर्ण अधिग्रहण केले होते. यात 1984 मध्ये गल्फ ऑईल आणि तीन वर्षांनी अशोक लेलँडचे अधिग्रहण सामील आहे.
1919 मध्ये समुहाची स्थापना
हिंदुजा समुहाची स्थापना 1919 साली झाली. त्या काळात याचे संस्थापक परमानंद दीपचंद हिंदुजा हे सिंधमधून (तत्कालीन भारताचा हिस्सा, आता पाकिस्तानात) इराणमध्ये गेले आणि एक जागतिक समूह निर्माण करण्याचा पाया रचला. समुहाने 1979 साली स्वत:चा मूळ व्यवसाय इराणमधून लंडन येथे हलविला आणि जागतिक विस्ताराच्या एका नव्या युगाची सुरुवात केली होती. हिंदुजा समूह जगभरात सुमारे 2 लाख लोकांना थेट रोजगार प्रदान करतो.









