अ.भा. बजरंग दलाचे संयोजक नीरज दनोरीया यांचा इशारा : हजारो शिवप्रेमी, नागरिकांच्या उपस्थितीत म्हापशात भव्य मिरवणुकीने व महाआरतीने शौर्ययात्रेचा समारोह
म्हापसा : ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज स्थापन केले त्याप्रमाणे आम्ही भारत देशाला पुढे घेऊन जाणार आहोत. यासाठी सर्वांनी नवभारत निर्माण करण्यासाठी सहकार्य करावे, त्याचबरोबर जर कोणी हिंदू धर्मावर आघात करण्याचा प्रयत्न केला तर तो कदापि खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा अखिल भारतीय बजरंग दलाचे संयोजक नीरजजी दनोरीया यांनी म्हापसा येथे सभेत प्रमुख वक्ते या नात्याने बोलताना दिला. म्हापसा टॅक्सी स्थानकावर विश्व हिंदू परिषद, बजरंग दल गोमंतक आयोजित शिवशौर्य यात्रा भव्य मिरवणुकीचा समारोह कार्यक्रमात दनोरीया बोलत होते. यावेळी व्यासपीठावर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, मंत्री सुभाष फळदेसाई, खासदार सदानंद शेट तानावडे, मोहन आमशेकर, उपसभापती जोशुआ डिसोझा, आमदार केदार नाईक, आमदार प्रेमेंद्र शेट, सुलक्षणा सावंत, नगराध्यक्षा प्रिया मिशाळ, अमेय नाटेकर, तन्वेश केणी आदी मान्यवर उपस्थित होते. सर्वप्रथम मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी शिवाजी महाराजाच्या पुतळ्dयावर दुधाभिषेक केला नंतर पुष्पहार घालून मानवंदना दिली.
इस्लाम विरोधात बजरंग सक्रिय आहेत
गोव्यात हिंदू समाज कमी आहे असे गोव्याबाहेर बोलले जाते मात्र येथे 72 टक्के हिंदू आहेत हे समजल्यावर खूप आनंद झाला. आज देशात गोहत्या, इस्लामिक जिहादमुळे आतंकवाद वाढू लागला आहे. मात्र ते विसरतात की देशात 1 कोटी बजरंग इस्लामविरोधात काम करीत आहे, असे प्रमुख वक्ते दनोरीया म्हणाले.
शिवशौय यात्रेमुळे हिंदू जागृत झाले
शिवशौर्य यात्रेमुळे हिंदू आज जागृत झाला आहे. राजमाता जिजाबाईंनी बाल शिवाजीला सनातनचे धडे देत लढण्यास शिकविले. त्यामुळेच छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज स्थापनेचा संकल्प केला व किल्यावर केसरी झेंडा चढविला. 365 हून अधिक किल्ले जिंकले. आज संकल्प करण्याची वेळ आली आहे. भारत देशाला बदनाम करण्याचे सत्र सुरू आहे. भारताचे अच्छे दिन त्यांना बघवत नाही. बढते भारत को अच्छा करण्यासाठी आम्ही आता पुढे आलो पाहिले, असे ते म्हणाले.
सनातन धर्म स्वीकारा
1984 साली सर्व हिंदूना जोडण्याचे काम हिंदू परिषदने केले आहे. आज प्रत्येकजण हिंदू असल्याचे सोशल मीडियावर घालत आहे. सर्वांनी सनातन धर्म स्वीकारला पाहिजे. अखंड भारतासाठी अगोदर सर्वांनी इंडिया न लिहिता भारत लिहिणे गरजेचे आहे. सनातन धर्म राष्ट्राला पुढे घेऊन जात आहे, असे त्यांनी सांगितले.
स्वराज्याचे सुराज्य करण्याची आज गरज : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले की, बेतूलच्या किल्यावर सुरू केलेल्या शौर्य यात्रेचे म्हापशात समारोह होत आहे. दैव, धर्म व देश या तीन गोष्टी शिवाजी महाराजांनी राखल्या. पोर्तुगीज मंदिरे उद्वस्त करीत होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी सप्तकोटेश्वर मंदिर प्रथम बांधून दाखविले व धर्मांतर करण्याचे पोर्तुगीजांनी बंद केले. 350 वर्षापूर्वी हे काम शिवाजी महाराजांनी केले. त्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. आज स्वराज्य नाही सुराज्य करण्याची गरज आहे. त्यासाठी सर्वांनी आपल्याला साथ द्यावी. राम मंदिर बांधण्यासाठी नरेंद्र मोदीजींनी पुढाकार घेतला. नवभारत निर्माण करण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र माजी करत आहेत त्यांना साथ द्या, असे मुख्यमंत्री म्हणाले. यावेळी मंत्री सुभाष फळदेसाई यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. मोहन आमशेकर यांनी आभार मानले.









