600 वर्षांपूर्वी काश्मीरमधील सर्वजण होते हिंदू
वृत्तसंस्था /डोडा
हिंदू धर्म हा इस्लामपेक्षा अत्यंत प्राचीन आहे. हिंदू धर्म हा सर्वात प्राचीन धर्म आहे. केवळ 10-20 मुस्लीम मुघल सैन्याचा हिस्सा होऊन आले होते, उर्वरित सर्व जणांचे धर्मांतर करविण्यात आले होते, असे जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री गुलाम नबी आझाद यांनी म्हटले आहे. आझाद यांनी जम्मू-काश्मीरच्या डोडा येथील थाथरी भागात एका सभेला संबोधित करताना हे वक्तव्य केले आहे. संसदेत मी अनेक गोष्टींबद्दल बोललो, जे लोकापर्यंत पोहोचू शकले नाही. भाजपच्या एका नेत्याने काही लोक बाहेरून आले होते असे म्हटले होते. यावर प्रत्युत्तर देताना भारतात कुणीच बाहेरून आले नव्हते, असे सांगितले होते. इस्लाम धर्म 1500 वर्षांपूर्वीचा आहे, तर हिंदू धर्म खूपच जुन्या काळापासून अस्तित्वात आहे. मुघलांच्या फौजमधून केवळ 10-20 मुस्लीम येथे आले असावेत. उर्वरित सर्वजणांचे धर्मांतर होत मुस्लीम झाले आहेत. याचे उदाहरण काश्मीरमध्ये दिसून येते. काश्मीरमध्ये 600 वर्षांपूर्वी सर्वजण हिंदू होते, परंतु आता येथील बहुतांश लोक मुस्लीम आहेत. या लोकांचे पूर्वज हिंदूच होते. आम्ही बाहेरून आलेलो नाही, याच मातीत आम्ही जन्म घेतला असून येथेच आम्ही सामावले जाणार आहोत, असे आझाद यांनी म्हटले आहे. राजकारणात धर्म आणू पाडणारे कमकुवत असतात. राजकारणाचा धर्माशी कुठलाच सबंध नाही. लोकांनी धर्माच्या नावावर मतदान करू नये. जर कुणी धर्माच्या नावावर मते मागत असेल तर हा प्रकार देशाच्या प्रगतीत अडथळे आणून द्वेष फैलावत असतो. आमच्या पक्षात धर्माला कुठलेच स्थान नसल्याचे आझाद म्हणाले. 73 गुलाम नबी आझाद यांनी मागील वर्षी काँग्रेसमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर त्यांनी डेमोक्रेटिक आझाद पक्ष स्थापन केला आहे.









