एक महिन्यात दुसरी घटना
वृत्तसंस्था/ व्हिक्टोरिया
कॅनडाच्या ब्रिटिश कोलंबिया प्रांतात एका हिंदू मंदिरात पुन्हा तोडफोड करण्यात आली आहे. एक महिन्यात अशाप्रकारची दुसरी घटना घडली आहे. हे मंदिर माता भामेश्वरी दुर्गा देवीचे असून ते सरे या ठिकाणी आहे. मंदिराच्या भिंतीवर काळ्या रंगाद्वारे भारतविरोधी संदेश लिहिले गेले आहेत. मंदिरांच्या भिंतीवर ‘पंजाब म्हणजे भारत नाही’ असे लिहिले गेले असून या घटनेची छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल झाली आहेत.
हिंदू मंदिर माता भामेश्वरी दुर्गा देवी सोसायटीत तोडफोड करण्यात आली आहे. भिंतींवर भारतविरोधी संदेश लिहून समुदायात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला असल्याची माहिती रेडिओ एएम600 चे न्यूज डायरेक्टर समीर कौशल यांनी दिली आहे.
पोलिसांना या घटनेबद्दल कळविण्यात आले असून तपास सुरू करण्यात आला आहे. सरे पूर्वी ब्रिटिश कोलंबिया प्रांतील आणखी एका प्रमुख मंदिरात खलिस्तानी समर्थकांकडून तोडफोड करण्यात आली होती असे कौशल यांनी सांगितले आहे.









