धर्मांतर बंदी कायदा रद्द विरोधात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
प्रतिनिधी/ बेळगाव
राज्य सरकारने मंत्रिमंडळामध्ये धर्मांतर बंदी कायदा मागे घेण्याचा निर्णय घेतला. यामुळे हिंदुत्ववादी संघटनांतून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. बेळगावमधील विश्व हिंदु परिषद आणि बजरंग दलतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून काँग्रेस सरकारचा तीव्र शब्दात निषेध नोंदविण्यात आला. धर्मांतर बंदी कायदा रद्दला आपला तीव्र विरोध असल्याचे निवेदन यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे.
आमचा कोणत्याही धर्माला विरोध नाही. हिंदुबरोबरच इतर सर्व धर्मिय सोबत राहू शकतात. मात्र आमिषे दाखविणे, दडपशाही करून जर धर्मांतर करत असतील तर त्याला आमचा तीव्र विरोध आहे. त्यासाठी धर्मांतर बंदी कायदा लागू करण्यात आला होता. असे असताना आता काँग्रेसने धर्मांतर बंदी कायदा रद्द केला आहे. त्यामुळे त्याचा हिंदु संघटना निषेध करत असल्याचे या निवेदनात म्हटले आहे.
काँग्रेसने हा निर्णय घेऊन हिंदुंच्या भावना दुखावल्या आहेत. राज्याला आणि देशाला हा मारक निर्णय असल्याचे म्हटले आहे. गो-हत्या बंदी, धर्मांतर बंदी कायदा मागे घेण्यासाठी काँग्रेसचा हा अट्टापिट्टा देशासाठी घातक असल्याचे म्हटले आहे. आपल्या धर्माचे रक्षण करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. त्यासाठी आम्ही आजपर्यंत लढा देत आलो आहे. असे असताना काँग्रेसने हिंदु समाजाचा विश्वासघात केला आहे, असेही या निवेदनात म्हटले आहे.
काँग्रेसने सत्तेच्या जोरावर हिंदुंना वेठीस धरण्याचा आरोप या निवेदनात करण्यात आला आहे. काँग्रेसने घेतलेला हा निर्णय तातडीने मागे घ्यावा, असे आवाहनही निवेदनात करण्यात आले आहे. शालेय अभ्यासक्रमातून राष्ट्रपुरुषांचा समावेश मागे घेण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. एकूणच काँग्रेस अल्पसंख्याकांना खूश करण्यासाठी प्रयत्न करत असल्याचा आरोपदेखील करण्यात आला.
महसूल अधिकारी एस. एम. परगी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी विश्व हिंदु परिषद आणि बजरंग दलचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.