सर्वोच्च न्यायालयाने दिला महत्त्वपूर्ण निर्णय
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
हिंदू विवाह ही पवित्र संकल्पना आहे. तो व्यापारी सौदा मानण्यात येऊ शकत नाही. त्यामुळे कोणी पत्नी अशा विवाहाचा उपयोग पतीकडून पैसा उकळण्याचे साधन म्हणून करत असेल तर न्यायालय मान्यता देणार नाही, असा महत्त्वपूर्ण निर्णय न्या. बी. व्ही. नागरत्ना आणि न्या. पंकज मित्तल यांच्या खंडपीठाने दिला. वैवाहिक वादावर तोडगा काढताना सर्वोच्च न्यायालयाने हा निवाडा देताना घटस्फोट मंजूर करण्यासोबतच पतीविरुद्ध पत्नीने दाखल केलेले सर्व फौजदारी खटलेही रद्द केले.
महिलांना संरक्षण देण्यासाठी अनेक कायदे करण्यात आले आहेत. मात्र, या कायद्यांचा उपयोग काही महिला आपल्या पतीकडून पैसा उकळण्यासाठीचे साधन म्हणून करताना दिसून येत आहेत. हिंदू विवाह संस्था हा व्यापारी सौदा नसतो. तर ते एक पवित्र बंधन असते. ते नको असेल तर त्यापासून मुक्तता मिळविण्याचा महिलेला अधिकार आहे. तथापि, तिच्या संरक्षणासाठी करण्यात आलेल्या कायद्यांचा दुरुपयोग ती करत असेल आणि पती किंवा त्याचे नातेवाईक यांचे शोषण करण्यासाठीचे शस्त्र म्हणून करत असेल, तर असा प्रयत्न हाणून पाडण्याचे कर्तव्य न्यायालयाला करावे लागेल. कायद्यांचा दुरुपयोग होत असेल तर त्यांचा मूळ उद्देशच हरविला जातो, हे संबंधितांनी लक्षात ठेवावयास हवे, अशीही टिप्पणी न्यायालयाने या निर्णयात केलेली आहे.
प्रकरण काय आहे…
एका प्रकरणात घटस्फोट संमत करताना कनिष्ठ न्यायालयाने पतीने पत्नीला 12 कोटी रुपयांची भरपाई द्यावी असा आदेश दिला होता. पत्नीने पतीविरोधात कौटुंबिक हिंसाचार केल्याची तक्रारही केली होती. पोलिसांनी पतीविरोधात त्वरित कारवाई केली होती. पतीने तक्रारीला आणि भरपाईच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाचा सविस्तर उहापोह करून पतीविरोधातील गुन्हेगारी प्रकरणे रद्द करण्याचा आदेश दिला. तसेच भरपाईचा आदेशही रद्द ठरविला आहे. कौटुंबिक हिंसाचार प्रकरणांमध्ये पोलीस काहीवेळा घाई करुन पुरेसा अभ्यास न करताच पतीविरोधात किंवा त्याच्या माता-पित्यांविरोधात कारवाई करतात. त्यामुळे नाहक पती आणि त्याच्या कुटुंबियांना त्रास होतो. हे टाळले गेले पाहिजे. पोलिसांनी पुरेसा आणि विश्वासार्ह पुरावा असेल तरच कारवाई करावयास हवी, अशी टिप्पणीही न्यायालयाने हा निर्णय देताना केली आहे. तसेच हा निर्णय देताना सर्वोच्च न्यायालयाने कायद्याच्या दुरुपयोगाचे दुष्परिणाम कसे होतात, यावर महत्त्वपूर्ण आणि गंभीर भाष्य केले आहे.









