ऑनलाईन टीम / तरुण भारत :
लव्ह जिहाद आणि धर्मांतर विरोधी कायदा संपूर्ण देशभरात लागू करावा, या मागणीसाठी सकल हिंदू समाजाचा ‘जन आक्रोश मोर्चा’ शिवाजी पार्क मैदानातून निघाला आहे. अनेक हिंदुत्ववादी संघटना या मोर्चात सहभागी झाल्या आहेत.
राज्यात वाढलेल्या लव्ह जिहादच्या घटना, मुंबईत फोफावलेले लँड माफिया तसेच मशिदीवरील भोंग्या विरोधात हा मोर्चा काढण्यात आला आहे. मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या मोर्चाला महत्त्व प्राप्त झालं आहे. भाजप नेते प्रवीण दरेकर, किरीट सोमय्या, आशिष शेलार, केशव उपाध्ये आणि चित्रा वाघ या मोर्चात सहभागी झाले आहेत. शिंदे गटाचेही नेते या मोर्चात सहभागी आहेत. हा मोर्चा कामगार मैदानाकडे मार्गस्थ होत आहे. या मोर्चात सहभागी होणाऱ्या नागरिकांची संख्या वाढताना दिसत आहे. या मोर्चाचे नेतृत्व महिला करत आहेत. हा मोर्चा प्रभादेवीपर्यंत काढण्यात येणार आहे. तिथे एक सभा होणार आहे.
अधिक वाचा : उजनीचा उजवा कालवा फुटला; शेकडो एकर क्षेत्र पाण्याखाली, पिकांचं मोठं नुकसान
“जो हिंदू हित का काम करेगा, वही देश पे राज करेगा, गर्व से कहो हम हिंदू है”, अशा प्रकारच्या घोषणा मोर्चादरम्यान देण्यात येत आहेत. मोर्चात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त करण्यात आला आहे.