2000 वर्षे जुन्या मूर्ती असल्याचा अनुमान
वृत्तसंस्था/ अनंतनाग
जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यात उत्खननादरम्यान शिवलिंगासमवेत प्राचीन हिंदू मूर्ती सापडल्या आहेत. या मूर्ती ऐशमुकामच्या सलिया भागात करकूट नाग येथे प्राप्त झाल्या आहेत. हा भाग काश्मिरी पंडितांसाठी महत्त्वपूर्ण आहे. येथील पंडत सर्वसाधारणपणे या भागाला करकूट वंशाशी जोडतात, या वंशाने ईसवी सन 625 ते 855 पर्यंत येथे राज्य केल्याचे मानले जाते. हे ठिकाण जिल्हा मुख्यालयापासून सुमारे 16 किलोमीटर अंतरावर आहे.
जम्मू-काश्मीरचा सार्वजनिक बांधकाम विभाग येथे एका झऱ्याच्या जिर्णोद्धाराचे काम करवून घेत होता, याचदरम्यान मजुरांना येथे मूर्ती मिळाल्या आहेत. झऱ्याच्या खोदकामात 11 शिवलिंगांसमवेत एकूण 15 प्राचीन मूर्ती मिळाल्या आहेत. या मूर्ती एका प्राचीन मंदिराचा हिस्सा मानण्यात येत आहेत, जे दशकांपूर्वी येथे अस्तित्वात होते.
या मूर्ती मिळाल्याचे कळताच राज्य अभिलेखागार, पुरातत्व तसेच संग्रहालय विभागाचे अधिकारी येथे तातडीने पोहोचले आणि त्यांनी याची तपासणी केली. या मूर्तींविषयी अधिक माहिती मिळविण्यासाठी त्या श्रीनगर येथे नेण्यात येणार आहेत. या मूर्ती एसपीएस संग्रहालयात ठेवण्यात येतील, जेथे संशोधक त्याविषयी अधिक माहिती मिळविण्याचा प्रयत्न करणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
या क्षेत्रावर करकूट वंशाचा प्रभाव राहिला आहे. याचमुळे येथे एखादे मंदिर राहिले असण्याची शक्यता आहे. जिल्हा मुख्यालयापासून सुमारे 16 किलोमीटर अंतरावरील हे ठिकाण तीर्थस्थळ राहिले आहे. या मूर्ती पवित्र तलावातून प्राप्त झाल्या आहेत. या मूर्ती संरक्षित केल्या जाव्यात अशी आमची इच्छा आहे. याचमुळे आम्ही येथे एक मंदिर निर्माण करण्याचे आणि या शिवलिंगांना येथे प्रतिष्ठापित करण्याची मागणी सरकारकडे करत आहोत असे काश्मिरी पंडितांनी म्हटले आहे.









