दाक्षिणात्य चित्रपट हिंदीभाषिक भागात मोठी कमाई करत असल्याने आता दक्षिणेतील कलाकारही आता बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवू लागले आहेत. तेलगू अभिनेता बेल्लमकोंडा साई श्रीनिवास आता बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. बेल्लमकोंडाचे बॉलिवूड पदार्पण हिंदी रिमेकद्वारे होणार आहे. मूळ चित्रपटाचे दिग्दर्शन एस.एस. राजामौली यांनी केली होती. तर मुख्य भूमिका प्रभासने साकारली होती. ‘छत्रपति’ या चित्रपटाचा हिंदी रिमेक याच नावाने तयार केला जात आहे.
हिंदीत ‘छत्रपति’चे दिग्दर्शन व्ही.व्ही. विनायक यांनी केले आहे. चित्रपटाचे चित्रिकरण पूर्ण झाले आहे. या चित्रपटाचे फर्स्ट लुक पोस्टर सादर करण्यात आले आहे. बेल्लमकोंडाने हे पोस्टर शेअर केले आहे. ‘छत्रपति’ हा चित्रपट 12 मे रोजी प्रदर्शित होत आहे. चित्रपटाची कथा विजयेंद्र प्रसाद यांनी लिहिली असून दिग्दर्शन व्ही.व्ही. विनायक यांनी केले असल्याचे बेल्लमकोंडाने कॅप्शनदाखल नमूद केले आहे.
बेल्लमकोंडा श्रीनिवास हा निर्माते बेल्लमकोंडा सुरेश यांचा पुत्र आहे. 2014 मध्ये त्याने अल्लुडु सीनू चित्रपटाद्वारे पदार्पण केले होते. 2005 मध्ये राजामौली यांचा ‘छत्रपति’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. याची कहाणी त्यांचे वडिल के.व्ही. विजयेंद्र प्रसाद यांनी लिहिली होती. प्रभाससोबत श्रिया सरनने यात मुख्य भूमिका साकारली होती.









