वृत्तसंस्था/चेन्नई
तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांनी पुन्हा एकदा केंद्र सरकारवर हिंदी लादण्याचा आरोप केला आहे. राज्य हिंदी लादण्याची अनुमती देणार नाही आणि तमिळ तसेच त्याच्या संस्कृतीचे रक्षण करणार आहे. आम्ही हिंदी लादण्याचा विरोध करू. हिंदी एक मुखवटा असून संस्कृत त्यामागे लपलेला चेहरा असल्याचा दावा स्टॅलिन यांनी केला आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या अंतर्गत तीन भाषांच्या सूत्राद्वारे केंद्र सरकार हिंदी लादत असल्याचा आरोप द्रमुक सरकार करत आहे. तर केंद्र सरकारने हा आरोप नाकारला आहे. बिहार, उत्तरप्रदेश आणि मध्यप्रदेश यासारख्या उत्तर भारतीय राज्यांमध्ये बोलल्या जाणाऱ्या अनेक भाषा उदाहरणार्थ मैथिली, ब्रजभाषा, बुंदेलखंडी आणि अवधीला हिंदीच्या प्रभुत्वाने नष्ट केल्याचा दावा स्टॅलिन यांनी पत्राद्वारे केला आहे. 25 पेक्षा अधिक उत्तर भारतीय भाषांना हिंदी अन् संस्कृतच्या प्रभुत्वाने संपविले आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरणात संस्कृतला चालना देण्यात येत असून राज्यांमध्ये याला लागू करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप स्टॅलिन यांनी केला आहे. तामिळनाडूने तीन भाषा धोरण स्वीकारले, तर तमिळकडे दुर्लक्ष केले जाईल आणि भविष्यात संस्कृतचे प्रभुत्व निर्माण होणार असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
संस्कृत लादण्याची योजना
राष्ट्रीय शिक्षण धोरणातील तरतुदींनुसार अन्य भारतीय भाषांना संस्कृतबरोबर शिकविले जाईल आणि तमिळ सारख्या भाषांना ऑनलाइन शिकविण्यात येईल. यामुळे केंद्र सरकार संस्कृत लादण्याची योजना तयार करत असल्याचे स्पष्ट होते असे स्टॅलिन यांनी म्हटले आहे.









