संस्थापकांचा निर्णय : अदानींवरील आरोपांमुळे कंपनी चर्चेत
वृत्तसंस्था/वॉशिंग्टन
भारतीय उद्योगपती गौतम अदानींवर गंभीर आरोप करून चर्चेत आलेली अमेरिकेची सुप्रसिद्ध शॉर्ट सेलिंग फर्म हिंडेनबर्ग रिसर्च आता बंद होणार आहे. कंपनीचे संस्थापक नाथन अँडरसन यांनी गुरुवारी याची घोषणा केली. हिंडेनबर्गच्या संस्थापकांनीच एका भावनिक सोशल मीडिया पोस्टमधून यासंबंधीची माहिती दिली आहे.
हिंडेनबर्ग कंपनीने आपला प्रवास, संघर्ष आणि यश शेअर केले. ‘आम्ही ज्या मुद्द्यांवर काम करत होतो ते संपल्यानंतर कंपनी बंद करण्याची योजना होती आणि तो दिवस आज आहे’ असे कंपनीचे संस्थापक अँडरसन यांनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केले आहे. 2017 मध्ये कंपनी स्थापन झाल्यापासून हिंडेनबर्ग रिसर्चने उद्योगातील फसवणूक, भ्रष्टाचार आणि गैरव्यवस्थापन उघड करण्यात प्रतिष्ठा मिळवली. हिंडेनबर्गला आर्थिक तपासाचे एक शक्तिशाली केंद्र बनवण्याचे श्रेय अँडरसन यांनी आपल्या कुटुंबाच्या, मित्रांच्या आणि 11 जणांच्या समर्पित टीमच्या पाठिंब्याला दिले आहे. कोणत्याही आर्थिक पार्श्वभूमीशिवाय फर्म सुरू केली. कामाला प्रारंभ करताना आपल्याकडे आर्थिक संसाधने नव्हती किंवा उद्योगाशी संबंध नव्हते, असेही अँडरसन यांनी म्हटले आहे.
हिंडेनबर्ग रिसर्चच्या अहवालांमुळे भारतातील अदानी ग्रुप आणि इकान एंटरप्रायझेससह अनेक कंपन्यांचे अब्जावधी डॉलर्सचे नुकसान झाले. 2017 ते 2024 पर्यंत या कंपनीने आपल्या अहवालांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर बरीच खळबळ उडवून दिली. या काळात, गौतम अदानी, जॅक डोर्सी आणि कार्ल इकान सारख्या जगातील आघाडीच्या अब्जाधीश उद्योगपतींना सर्वात जास्त नुकसान सहन करावे लागले. जानेवारी 2023 मध्ये अदानी समूहाला सुमारे 1 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले होते. हिंडेनबर्गचा अहवाल समोर आल्यानंतर अदानी ग्रुपच्या सर्व कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली होती. हिंडेनबर्ग रिसर्च कंपनीच्या अहवालाचा आधार घेत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी गौतम अदानी आणि मोदी सरकार यांच्यावर जोरदार टीका केली होती.









