वृत्तसंस्था / नवी दिल्ली
हिंडेनबर्ग हे केवळ हिमनगाचे दिसणारे टोक आहे. शेअरबाजारात या ही पेक्षा अधिक घोटाळे असून केवळ संयुक्त संसदीय समितीच त्यांच्यावर प्रकाश टाकू शकेल, असा आरोप काँग्रेसचे प्रवक्ते जयराम रमेश यांनी केला आहे. हिंडेनबर्ग या अमेरिकन शॉर्ट सेलिंग कंपनीने भारताच्या सेबी या शेअरबाजार नियंत्रक संस्थेच्या अध्यक्षा माधवी बूच यांच्यासंबंधी काही आरोप केले होते. त्यामुळे राजकीय गदारोळ उठला होता. काँग्रेसने या प्रकरणी चौकशीसाठी संयुक्त सांसदीय समिती स्थापन करण्याची मागणी केली होती. तथापि, या संदर्भातील मागच्या एका प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने अदानी उद्योगसमूहाला क्लिनचिट दिली होती. हिंडेनबर्गने कथितरित्या उघड केलेले नवे प्रकरण अदानी उद्योकसमूहाशी संबंधित आहे. बूच यांनी अदानी यांच्या विदेशी कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली असल्याचा आरोप हिंडेनबर्ग कंपनीने मागच्या आठवड्यात केला होता. तथापि, तो फुसका बाँब ठरल्याचे शेअरबाजाराच्या प्रतिक्रियेवरुन त्याचवेळी स्पष्ट झाले होते.









