पथदीप बंद असल्याने अपघात : पथदीप वेळेत सुरू करण्याची मागणी
बेळगाव : हिंडलगा-वेंगुर्ला महामार्गावरील हिंडलगा गावानजीक पथदीप बंद आहेत. हिंडलगा कारागृहानजीक गतिरोधक असल्यामुळे रात्रीच्यावेळी ते निदर्शनास न आल्याने अपघात होत आहेत. काही दिवसांपूर्वी तर दुभाजकावर ट्रक चढविण्यात आला होता, असे प्रकार वारंवार घडत असल्याने अपघात घडण्यापूर्वी हिंडलगा परिसरातील पथदीप सुरू करण्याची मागणी करण्यात येत आहे. महात्मा गांधी पुतळ्यापासून ते हिंडलगा कारागृहापर्यंत पथदीप बंद आहेत. यामुळे या रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांना अंधारातूनच वाटचाल करावी लागत आहे. चंदगड, गोवा, सावंतवाडी, कुडाळ येथून शहरात प्रवेश करणाऱ्या नागरिकांना अंधारातूनच यावे लागते. त्यामुळे पथदीप सुरू करणे गरजेचे झाले आहे. पथदीप सुरू करणे व विद्युत बिल भरण्यावरून कारागृह व हिंडलगा ग्रामपंचायत यांच्यामध्ये मतभेद होते. परंतु नागरिकांच्या सेवेसाठी हे मतभेद बाजूला ठेवून पथदीप सुरू करण्याची मागणी होत आहे. हिंडलगा कारागृहानजीक गतिरोधक आहेत. रात्रीच्यावेळी नवीन वाहनचालकांना गतिरोधकाचा अंदाज न आल्याने अंधारात अपघात होत आहेत. काही दिवसांपूर्वी एका ट्रक चालकाने थेट दुभाजकावरच वाहन चाढविले होते, असे प्रकार वारंवार घडत असून आजूबाजुच्या विक्रेते व रहिवाशांना जीव मुठीत घेऊन राहावे लागत आहे. त्यामुळे पथदीप वेळेत सुरू करावेत, अशी मागणी होत आहे.









