वार्ताहर /काकती
घनकचरा रस्त्याच्या बाजूला टाकल्याने गावचे सौंदर्य तर नष्ट होतेच. शिवाय आरोग्य विषयक प्रश्न निर्माण होऊन पर्यावरणालादेखील हानी पोहोचते. या करिता टाकलेला कचरा विल्हेवाट लावण्यासाठी वेगळा प्रोजेक्ट करावा. हिंडाल्को इंडस्ट्रिजची मदत गावच्या पाठीशी राहील, असे ठाम आश्वासन हिंडाल्को इंडस्ट्रिजचे व्हाईस प्रेसिडेंट विश्वास शिंदे यांनी दिले. हिंडाल्को इंडस्ट्रीजच्यावतीने काकती ग्रामपंचायतीला 7 लाख रुपये किंमतीची कचरा वाहू करणारी गाडी देण्यात आली. हिंडाल्को इंडस्ट्रीजचे जॉईंट प्रेसिडेंट (एचआर मुंबई) शशीर शर्मा यांच्या हस्ते गाडीच्या चाव्या ग्रामपंचायत अध्यक्ष सुनील सुणगार, उपाध्यक्ष वर्षा मुचंडीकर यांच्याकडे सुपूर्द करून गाडीचे लोकार्पण करण्यात आले. अध्यक्षस्थानी ग्रामपंचायत अध्यक्ष सुनिल सुणगार होते.
विश्वास शिंदे पुढे म्हणाले, गावात टाकलेला कचरा परत गावात येणार. कचरा गोळा करणे सोपे आहे. त्याची योग्य रीतीने विल्हेवाट लावणे खर्चाची बाब आहे. पर्यावरणाच्या दृष्टीने फार महत्त्वाची समस्या आहे. सदर कचरा गाडी आधुनिक असून घनकचरा, ओला कचरा इतर कचरा यासाठी चार विभाग केले असून कचरा भरणे, टाकणे या करिता हैड्रोलिक सिस्टीम असल्याने सोपे आहे. कचरा रस्त्यावर टाकणार नाही, अशी लोकभावना असणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. स्वच्छतेच्या बाबतीत दुसऱ्या ग्रामपंचायतींनी काकती ग्रामपंचायतीची प्रेरणा घ्यावी. काकती ग्रा. पं. आदर्श व्हावी, अशा शुभेच्छा दिल्या. हिंडाल्कोचे जॉईंट प्रेसिडेंट (एचआर) शशीर शर्मा म्हणाले, काकती गावच्या विकासासाठी सकारात्मक विश्वासासह कार्य करीत असून नेहमीच कंपनीच्या सामाजिक विकासातून साथ देत आहे. विकासाचा कायापालट करण्यासाठी पुढे चला आमची साथ आहे, असा विश्वास देऊन शुभेच्छा दिल्या. माजी जि. पं. सदस्य सिद्दगौडा सुणगार, माजी तालुका पंचायत सदस्य यल्लाप्पा कोळेकर आदींनी हिंडाल्कोचे कर्तव्यदक्ष अधिकारी विश्वास शिंदे यांच्या कार्याचे कौतुक करुन हिंडाल्कोच्या कल्याणकारी योजनांचा फायदा गावाला झाला असल्याचे विचार मांडले. य् ाावेळी हिंडाल्कोच्या प्रमुख अधिकाऱ्यांसह जनसंपर्क अधिकारी रवि बिसगुप्पी, मयुर कृष्णा आदींचाही सत्कार करण्यात आला. य् ाावेळी सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण पाटील, भावकाण्णा टुमरी, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.









