हिंडाल्को वॉरिअर्स संघाने रोमांचक खेळ खेळत अंतिम सामना जिंकला : कणबर्गी बॉईजचीही चमकदार कामगिरी
वार्ताहर /काकती
हिंडाल्को कम्युनिटी व्हॉलीबॉल करंडक 2024 स्पर्धा मोठ्या उत्साहात यशस्वीरित्या पार पडली. हिंडाल्को वॉरिअर्स संघाने रोमांचक खेळ खेळत अंतिम सामनाही जिंकून प्रथम क्रमांक पटकाविला. कणबर्गी बॉईजनेही चमकदार कामगिरी करत द्वितीय क्रमांक पटकाविला. तर ऑल राऊंडर म्हणून सुनिल पाटील यांनी खेळात वेगळा ठसा उमटविला. हिंडाल्को इंडस्ट्रीज लि. वतीने बेळगाव तालुक्यातील सात दत्तक गावांसाठी खेळाना उत्तेजन देण्यासाठी पाच दिवसीय व्हॉलीबॉल करंडक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. हिंडाल्को वॉरिअर्स व कणबर्गी बॉईज या संघांनी अंतिम फेरीत प्रवेश केला. मात्र दुसऱ्या फेरीत हिंडाल्को वॉरिअर्सने चांगली कामगिरी करत विजय निश्चित केला. हिंडाल्को वॉरियर्स व कणबर्गी बॉईज यांच्यातील लढत सुरुवातीला अटीतटीची झाली. दोन संघांमधील 9 गुणानंतर कणबर्गी बॉईज संघाची कामगिरी कमी पडली. ही संधी साधून हिंडाल्को वॉरिअर्सने 13 चेंडू ठोकून रोमांचक वळण घेतले.
या लढतीत 13-21 फरकाने शानदार विजय मिळविला. या व्हालीबॉल करंडक सामन्यात 8 संघातील 72 खेळाडूनी सहभाग घेतला. स्पर्धा समारोपच्या अंतिम कार्यक्रमात हिंडाल्को इंडस्ट्रीज लि. युनिट हेड अभिजित बंडी आणि हिंडाल्कोचे मानव संसाधन विभागाचे प्रमुख अधिकारी मयूर कृष्णा यांनी विजेत्या संघांना करंडक प्रदान केले. आणि वैयक्तिक पदक देऊन सत्कार केला. याप्रसंगी कंपनीचे युनिट हेड प्रमुख अभिजित बंडी म्हणाले, या पाच दिवसीय सामन्यात खेळाडूनी एकता, प्रेम आणि एकमेकांबद्दल आदर राखून खेळ केला. ग्रामीण स्तरावर क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यासाठी लोकांचे सहकार्य देखील महत्त्वाचे आहे. खेळाडू व क्रीडाप्रेमीनी भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल सर्वांचे आभार मानले. हिंडाल्को वॉरिअर्स टिम नायक सुनिल पाटील, विशाल संभाजीचे, राजू हलभावी, सिदाप्पा बेळगावी, संतो नाईक, किरण बुड्रेण्णवर तर कणबर्गी बॉईज टिम नायक श्रीनिवास, प्रशांत बडिगेर, प्रकाश बनोशी, सुनिल शिगीहळ्ळी, राजू गिरगौडर, विशाल कोनाकेरी, प्रकाश आदींचे विशेष कौतुक करण्यात आले. यावेळी कामगार विभागप्रमुख महेश शेट्टी, विजय शेखरन, भरत सिनगे, राकेश नायक, शंकर जॉन, दिनेश नाईक, राजू माने, श्रीधर चिक्कमठ यासह सात गावातील मान्यवर, क्रीडाप्रेमी व कंपनीचा कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.









