वृत्तसंस्था/ ताश्कंद (उझबेकिस्तान)
येथे सुरु असलेल्या आशियाई युवा अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताची महिला धावपटू हिना रेझोना मलिकने महिलांच्या 400 मी. धावण्याच्या शर्यतीत सुवर्णपदकासह नवा आशियाई स्पर्धा विक्रम नोंदविला.
गेल्या मार्च महिन्यात उडपी येथे झालेल्या युवा राष्ट्रीय अॅथलेटिक्स स्पर्धेत हिना मलिकने महिलांच्या 400 मी. धावण्याच्या शर्यतीत सुवर्णपदक मिळविले होते. या स्पर्धेनंतर एक आठवड्याच्या कालावधीत तिने 16 व्या वर्षात पर्दापण केले होते. 16 वर्षाखालील वयोगटात तिला या क्रीडा प्रकारात राष्ट्रीय विक्रम करता आला नव्हता. पण त्यानंतर तिने ताश्कंदमधील स्पर्धेत या क्रीडाप्रकारात सुवर्णपदक तर मिळविलेच तसेच तिने 18 वर्षाखालील वयोगटातील नवा राष्ट्रीय विक्रम नोंदविताना 52.98 सेकंदाचा अवधी घेतला. या स्पर्धेच्या इतिहासात हिनाने यापूर्वी सलवा इद नासिरने नोंदविलेला 53.02 सेकंदाचा स्पर्धा विक्रम मागे टाकला. बंगालच्या हिना मलिकला प्रशिक्षक अर्जुन अजय यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभत आहे. ताश्कंदमध्ये झालेल्या युवा आशियाई अॅथलेटिक्स स्पर्धेत तिने महिलांच्या 400 मी. धावण्याच्या शर्यतीत सुवर्णपदक तसेच महिलांच्या 200 मी. धावण्याच्या शर्यतीत रौप्य पदक आणि महिलांच्या मिडले प्रकारात भारतीय संघाला सुवर्णपदक मिळवून दिले होते.









