काँग्रेसचे अनेक आमदार संपर्कात असल्याचा राजिंदर राणा यांचा दावा
► वृत्तसंस्था/ शिमला
हिमाचल प्रदेशातील राजकीय संकट अद्याप संपलेले दिसत नाही. बंडखोर आमदार राजिंदर राणा यांनी राज्यातील सुखविंदर सिंग सुक्खू सरकारवर जोरदार हल्ला चढवला. गेल्या सव्वा-दीड वर्षापासून राज्यात सर्व काही सुरळीत होत नसल्याचे आम्ही अनेकवेळा हायकमांडला कळवले. मुख्यमंत्री सुक्खू यांच्याकडून आमदारांचा अपमान केला जात होता. तसेच आमदारांची कामेही होत नव्हती असा दावा करत राणा यांनी हिमाचल प्रदेशमधील काँग्रेसचे सरकार लवकरच कोसळेल, असा दावा केला आहे.
गेल्या आठ दिवसांपासून हिमाचल प्रदेशमध्ये जोरदार राजकीय संघर्ष सुरू आहे. राज्यसभा निवडणुकीनंतर बदललेल्या स्थितीनंतर वातावरण अधिकच चिघळले आहे. त्यातच काही बंडखोर आमदारांवर कारवाई केल्यामुळे सरकार टिकविण्याची कसरत काँग्रेसला करावी लागत आहे. तर भाजपने बंडखोर आमदारांसह अपक्षांना आपल्याकडे खेचण्यासाठी जोरदार प्रयत्न चालवल्याचे दिसून येत आहे. याचदरम्यान, सध्याचे सरकार फक्त मुख्यमंत्री सुक्खू यांच्या मित्रांचे सरकार आहे. याबाबत अनेकवेळा बोलूनही काही परिणाम झाला नाही. काँग्रेसचे अनेक आमदार संपर्कात असल्याचा दावा राणा यांनी केला आहे.
काँग्रेसचे बंडखोर नेते आणि विधानसभेतून अपात्र ठरलेले राजिंदर राणा म्हणाले की, काँग्रेसचे इतर अनेक आमदार त्यांच्या संपर्कात आहेत. लवकरच मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुक्खू यांच्या नेतृत्वाखालील सरकार पडणार आहे. मुख्यमंत्री चंदीगडमध्ये बसलेल्या सहा बंडखोर नेत्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत असल्याचा दावा पूर्णपणे खोटा आहे. मुख्यमंत्री आमदारांना अपमानित करण्याचे काम करतात. याबाबत आपण केंद्रीय हायकमांडकडेही अनेकदा आवाज उठवला असल्याचे राजिंदर राणा म्हणाले.
काँग्रेसने एका बाहेरच्या व्यक्तीला राज्यसभा खासदार होण्यासाठी हिमाचलमध्ये पाठवले. हिमाचलमधील एका व्यक्तीला जिंकून राज्यसभेवर पाठवल्याचा आनंद आहे. मुख्यमंत्री सुखविंदरसिंग सुक्खू हे लहान मनाचे आहेत. त्यांचे हृदय पक्ष्यासारखे लहान आहे. एखादी व्यक्ती मुख्यमंत्री झाल्यावर त्याने आपले हृदय मोठे केले पाहिजे, असेही राणा पुढे म्हणाले.
गेल्या दीड वर्षापासून राज्य सरकारचा कारभार संपूर्ण जनता पाहत आहे. हिमाचल प्रदेशातील काळा साप कोण आहे? हे जनता सांगेल. येणारा काळ सरकारचा प्रत्येक पदर उघड करेल. या सरकारने सर्वसामान्यांचा विश्वास गमावल्याचे सांगत लवकरच मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुक्खू यांच्या नेतृत्वाखालील सरकार पडेल, असा दावा राजिंदर राणा यांनी केला.









