काँग्रेस नेत्याला दिल्लीत हलविले
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
हिमाचलचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुक्खू हे उपचारासाठी दिल्लीतील एम्समध्ये पोहोचले आहेत. शिमला येथून ते शुक्रवारी सकाळी 9 वाजता दिल्लीसाठी रवाना झाले होते. सुक्खू यांना बुधवारी रात्री उशिरा अचानक त्रास सुरू झाल्याने उपचारासाठी आयजीएमसीत दाखल करण्यात आले होते. त्यांना पोटदुखीचा त्रास सुरू झाला होता. तेथे करण्यात आलेल्या वैद्यकीय तपासण्यांचे अहवाल प्राप्त झाल्यावर विविध उपचार करण्यात आले होते. 6 डॉक्टरांचे पथक त्यांच्या प्रकृतीवर नजर ठेवून होते. यादरम्यान मुख्यमंत्र्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी राज्याचे अनेक मंत्री रुग्णालयात पोहोचले होते.
मुख्यमंत्र्यांच्या प्रकृतीबद्दल घाबरण्याचे कुठलेच कारण नसल्याचे त्यांचे मुख्य माध्यम सल्लागार नरेश चौहान यांनी सांगितले आहे. सुक्खू यांना पुढील उपचारासाठी दिल्लीतील एम्समध्ये आणले गेले आहे. तेथे तज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीत त्यांच्यावर उपचार करण्यात येतील, यानंतर काही दिवसात सुक्खू हे राज्यात परततील असे चौहान यांनी म्हटले आहे.









