प्रतिनिधी/ म्हापसा
कर्लीज प्रकरण गाजत असतानाच आता हैदराबाद पोलिसांनी हणजूण येथील हिल टॉप रेस्टॉरंटचे मालक स्टीव्ह डिसोझा याला अटक केली आहे. गेल्या चार दिवसापासून हैदराबाद पोलीस राज्यात तळ ठोकून होते व ते स्टीव्हच्या शोधात होते. अखेर बुधवारी त्यांना संशयितास पकडण्यास यश आले. गोवा पोलीस अमली पदार्थ तपासात सहकार्य करीत नसल्याचा आरोप हैदराबाद पोलीस आयुक्तांनी केल्यावर गोवा पोलीस देशभर बदनामीच्या कचाटय़ात सापडले होते. मात्र राज्य पोलीस महासंचालकांनी हैदराबाद पोलिसांनी कोणतेही सहकार्य मागितले नव्हते उलट पोलीस सदैव मदतकार्य करतात असे पत्रकार परिषद घेऊन सांगितले होते. हैदराबाद पोलिसांनी हणजूण पोलीस स्थानकात सर्व सोपस्कार पूर्ण करून अखेर स्टीव्हला ताब्यात घेण्यास यश मिळविले.
संशयित आरोपी स्टीव्ह डिसोझा याच्यावर यापूर्वी हृदयविकाराची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्याला अटक केल्यावर हणजूण व हैदराबाद पोलिसांच्या सहकार्याने येथील जिल्हा आझिलो इस्पितळात नेले असता डॉक्टरांनी त्याला दाखल करून घेतले आहे. हैदराबाद पोलिसांनी त्याला हैदराबादला नेण्यासाठी ट्रान्सफर वॉरंट जारी केले असून त्याची सुनावणी गुरुवारी होणार असून त्यानंतर पोलीस पुढील निर्णय घेणार आहे.
दरम्यान याबाबत अधिकम ाहिती मिळविण्यासाठी हणजूण पोलिसांशी संपर्क साधला असता ते म्हणाले, तेलंगना राज्याच्या हैदराबाद शहर पोलीस निरीक्षक श्रीधर रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली स्टीव्ह डिसोझा याला अटक केली आहे. ते 374 सीआर मध्ये अमली पदार्थामध्ये आढळून आला असून त्यानुसार तेलंगना हैदराबाद पोलिसांना तो हवा आहे. हैदराबाद पोलिसांनी गोवा पोलिसांना याबाबत विनंती केल्यावर ही कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
हैदराबाद पोलीस इतर आरोपीच्याही शोधात
दरम्यान मंजूर अहमद, तुकाराम साळगावकर, विकास नाईक, रमेश चौहान, एडवीन नुनीस, सांजा गोवेकर हे गोव्यातील संशयित हैदराबाद पोलिसांना अमली पदार्थ प्रकरणी हवे आहेत त्यांचा शोध घेण्यासाठी हैदराबाद पोलीस राज्यात आले आहे. मात्र स्टीव्ह वगळता इतर पोलिसांच्या हाती अद्याप लाहू शकले नाही. यापूर्वी तेलंगना हैदराबाद पोलिसांनी गोवा पोलीस सहकार्य करीत नसल्याचा आरोप केल्याने राज्य पोलीस अडचणीत सापडले आबेत. त्या आधारेच आता राज्य हणजूण पोलिसांना संशयित आरोपी हैदराबाद पोलिसांना सुपूर्द करावा लागला अशी माहिती हाती आली आहे. याबाबत पूर्णतः गुप्तता पाळण्यात आली होती. वरिष्ठ पोलीस अधिकारी वर्गाच्या मार्गदर्शनानुसार स्टीव्हला ताब्यात घेण्यात आले. यापूर्वी कर्लीजचे मालक एडवीन नुनीस याला पोलिसांनी अटक केली होती. हैदराबादचे पोलीस आयुक्त सी व्ही. आनंद यांनी राज्य पोलीस सहकार्य करीत नसल्याने ड्रग्सच्या मुळापर्यंत जाण्यास व आरोपींना ताब्यात घेण्यास अपयश येत असल्याचे हैदराबादमध्ये पत्रकार परिषद घेऊन सांगितले. हे प्रकरण देशभर गाजले होते व राज्याची सर्वत्र बदनामी झाली होती.









