खेड :
गणेशोत्सवात वाहनांच्या रेलचेलीने गजबजणाऱ्या महामार्गावर वाहतूक कोंडीचे विघ्न दूर करून गणेशभक्तांच्या सुखकर प्रवासासाठी पळस्पे फाट्यापासून सिंधुदुर्गपर्यंत २४ तास ‘ड्युटी’ बजावणाऱ्या महामार्ग वाहतूक पोलिसांची गस्त अखेर संपुष्टात आली. सलग १५ दिवस महामार्गावर दिवस-रात्र ड्युटी बजावणाऱ्या वाहतूक पोलिसांनी वाहनचालकांच्या केलेल्या समुपदेशनामुळे अपघातांच्या संख्येतही कमालीची घट झाली.
महामार्गाच्या रखडलेल्या कामामुळे यंदाही गणेशमक्तांच्या मार्गात अडथळ्यांची शर्यत कायम राहिली. खडतर आणि जीवघेण्या प्रवासातून गणेशभक्तांना दिलासा देण्यासाठी महामार्ग वाहतूक पोलिसांसह स्थानिक पोलीस पुढे सरसावले. अपुरे बक्त असतानाही महामार्ग वाहतूक पोलिसांनी महामार्गावर उत्तम नियोजनाची आखणी करत उपलब्ध कर्मचाऱ्यांच्या सहाय्याने चोख व्यवस्था बजावली. यामुळे गतवर्षीच्या तुलनेत यंदा अपघातांची संख्याही घटली.
एरव्ही गणेशोत्सवात घडणाऱ्या प्राणांतिक अपघातामुळे वाहतूक व्यवस्थेचा पुरता फज्जा उडतो. यावर्षी मात्र या दुर्घटना रोखण्यात वाहतूक पोलिसांना कमालीचे यश आले. चोख बंदोबस्तासह वाहतूक पोलिसांनी वाहनचालकांच्या समुपदेशनासह वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे निर्देशही दिले होते. परतीच्या प्रवासातही महामार्ग वाहतूक पोलिसांनी २४ तास गस्तीवर भर दिला.
वेगावर नियंत्रण ठेवण्यासह प्रत्येक वाहनांवर सीसीटीव्ही कॅमेऱ्याची करडी नजर ठेवण्यात आली होती. वाहनांना वॉकीटॉकीधारी पोलिसांकडून संदेश गेल्यास केवळ ३ कि.मी. अंतरावर अडवण्याची व्यवस्थाही करण्यात आली होती. महामार्गावर विशेष पोलीस कक्षासह सुविधा केंद्रेही उभारण्यात आली होती. विशेषतः अपघातप्रवण क्षेत्रावर सर्वाधिक लक्ष केंद्रीत करण्यात आले होते.
- विशेष कृतीदलाचा बंदोबस्त संपुष्टात
गणेशोत्सवात कोकण मार्गावरून धावणाऱ्या नियमित रेल्वेगाड्यांसह गणपती स्पेशल गाड्या विक्रमी गर्दीने घावल्या. गणेशभक्तांची अडथळ्यांची शर्यत थांबवण्यासाठी कोकण मार्गावरील त्या-त्या रेल्वे स्थानकात रेल्वेच्या विशेष कृती दलाची कुमक तैनात करण्यात आली होती. रेल्वे पोलीस बंदोबस्तात चाकरमान्यांची सफर झाल्याने चाकरमान्यांच्या मनस्तापाचा भार कमी झाला. रेल्वेस्थानकात २४ तास ‘ड्युटी’ बजावणाऱ्या विशेष कृतीदलाचा बंदोबस्तही सोमवारी सायंकाळपासून संपुष्टात आला.








