वाहनांच्या वेग नियंत्रणासाठी नियोजन करण्याची नागरिक-पालकांतून मागणी
खानापूर : लोंढा येथील लोंढा एज्युकेशन सोसायटीच्या विद्यालयाच्या मैदानातूनच बेळगाव-गोवा महामार्ग तयार करण्यात आलेला आहे. महामार्गासाठी शाळेच्या मैदानाची 35 गुंठे जागा अधिग्रहित केलेली आहे. नव्याने निर्माण करण्यात आलेला महामार्ग शाळेच्या जवळून जात असल्याने विद्यार्थ्यांना या वाहतुकीमुळे धोका निर्माण झाला आहे. शाळेच्या समोरील रस्त्यावर वाहनांचा वेग कमी होण्यासाठी नियोजन करण्यात यावे, अशी मागणी पालक आणि नागरिकांतून होत आहे.
बेळगाव-गोवा नव्याने महामार्ग निर्माण करत असताना शाळेच्या आवाराचे कुंपण तोडून मैदानाची जवळपास 35 गुंठे जागा महामार्गासाठी अधिग्रहित करण्यात आली आहे. गेल्या सात वर्षापासून या महामार्गाचे काम सुरू आहे. लोंढा परिसरात महामार्गाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. मात्र शाळेच्या अधिग्रहित केलेल्या जमिनीची नुकसानभरपाई देण्यात आलेली नाही. तसेच शाळेच्या अगदी समोरुन महामार्ग गेल्याने शाळेच्या आवारातून विद्यार्थी सरळ रस्त्यावर येतात.
पहिली ते दहावीपर्यंत इंग्रजी, उर्दू आणि मराठी माध्यमाचे मिळून जवळपास 650 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. शाळेच्या मैदानाजवळूनच हा नवा महामार्ग गेल्याने विद्यार्थ्यांना हा महामार्ग धोकादायक बनला आहे. मैदानात खेळत असताना अचानकपणे विद्यार्थी रस्त्यावर जातात. त्यामुळे विद्यार्थ्यांना धोका निर्माण होऊ शकतो. तसेच शाळा सुटल्यानंतर एकाच वेळी सर्व विद्यार्थी घरी जाण्यासाठी रस्त्यावरच येतात. त्यामुळे या महामार्गावरुन वेगाने जाणाऱ्या वाहनामुळे विद्यार्थ्यांना धोका पत्करुन रस्ता ओलांडून जावे लागत आहे.
गतिरोधक बसविण्याची मागणी
यासाठी तसेच लोंढा गावात येणारी आणि लोंढा गावातून बाहेर जाणारी वाहने याच रस्त्यावरुन महामार्गावर येत असल्याने शाळेच्या आवारासमोरच वाहनांची मोठ्या प्रमाणात गर्दी होते. यासाठी कायमस्वरुपी वाहतूक पोलिसाची सोय करण्यात यावी, या ठिकाणी बॅरिकेड्स लावून वाहनांचा वेग कमी होण्यासाठी गतिरोधकही करण्यात यावेत तसेच रस्त्याच्या दोन्ही बाजूला बस सेल्टर उभारण्यात यावेत, अशी मागणी पालक आणि नागरिकांतून करण्यात येत आहे.









