संगमेश्वर :
तालुक्यातील मुंबई-गोवा महामार्गाची दयनीय अवस्था लक्षात घेता ‘उबाठा’ सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी ठेकेदार कंपनीची कानउघडणी केली. आरवलीपर्यंत रस्त्याची संपूर्ण वाताहत झाली असून खराब डायव्हर्जन व चिखलामुळे अपघातांची संख्या वाढली आहे. या पार्श्वभूमीवर ठेकेदार म्हात्रे कंपनीच्या अधिकाऱ्यांसह महामार्गाची पाहणी करण्यात आली.
या पाहणी दौऱ्याचे नेतृत्व ‘उबाठा’ सेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख सहदेव बेटकर व जि. प.चे माजी अध्यक्ष संतोष थेराडे यांनी केले. यावेळी म्हात्रे कंपनीचे महाव्यवस्थापक एच. एम. हल उपस्थित होते. यावेळी पूर्वसूचना देऊनही महामार्ग विभागाचा एकही अधिकारी पाहणीसाठी हजर नव्हता. पदाधिकाऱ्यांनी रस्त्याच्या अवस्थेकडे लक्ष वेधत अपघातांच्या घटनांबाबत चिंता व्यक्त केली. यावर ठेकेदाराने त्रुटी तातडीने दूर करण्याचे आश्वासन दिले असून लवकरच रस्ता सुस्थितीत केला जाईल, असे हल यांनी सांगितले. पाहणीवेळी तुरळ सरपंच सहदेव सुवरे, बंड्या बोरूकर, छोट्या गवाणकर, अरविंद जाधव, रामचंद्र हरेकर, दिलीप पेंढारी, प्रकाश घाणेकर, नंदकुमार फडकले उपस्थित होते








