उड्डाणपुलाच्या बांधकामासाठी दोन महिने बदल
पणजी : पर्वरी उड्डाणपुलाच्या बांधकामासाठी आराडी सुकूर जंक्शन (पोल-8) ते सांगोल्डा बायपास (पोल 18) हा महामार्ग सर्व प्रकारच्या वाहतुकीस 17 सप्टेंबर 2025 मध्यरात्रीपासून बंद करण्यात आला आहे. तो जवळपास दोन महिने म्हणजे 15 नोव्हेंबर 2025 पर्यंत बंद ठेवला जाणार आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याने त्याचा आदेश काढला आहे. या महामार्ग बंदीमुळे पणजीहून म्हापसा येथे जाणारी वाहतूक कोकेरो जंक्शनकडून चोगम मार्गाने वळवण्यात येणार आहे. बंद करण्यात आलेल्या महामार्गातील रहिवासी, आस्थापनातील कर्मचारी यांना तेथे जाण्यासाठी मार्ग देण्यात येणार आहे.
पुलाचे काम वेगाने होण्यासाठी आणि त्या कामास अडथळा येऊ नये म्हणून हा मार्ग बदल करण्यात आल्याचे बांधकाम खात्यातील सूत्रांनी सांगितले. वाहने व प्रवाशांची सुरक्षा लक्षात घेऊन ही व्यवस्था करण्यात आली आहे.या मार्ग बदलाचे सूचना फलक व इतर माहिती संबंधित ठिकाणी दर्शवण्यात येणार आहे. केंद्रीय वाहतूक मंत्रालयाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार हा बदल करण्यात येणार असून उड्डाणपुलाच्या पुढील कामासाठी सदर मार्गबदल अपरिहार्य असल्याची माहिती बांधकाम खात्याच्या सूत्रांनी दिली. या मार्गबदलामुळे पणजी ते म्हापसा मार्गावर नियमितपणे प्रवास करणाऱ्यांची मोठी गैरसोय होणार असल्याचे दिसून येत आहे.









