वृत्तसंस्था / चंदीगढ
हरियाणात शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु असून हजारो शेतकऱ्यांनी राष्ट्रीय महामार्ग एनएच 44 वर धरणे धरले आहे. यामुळे या मार्गावरील वाहतूक बंद पडली आहे. सूर्यफुलाच्या बियांना किमान आधारभूत किंमत द्यावी आणि या दराने राज्य सरकारने खरेदी करावी, या मागणीसाठी हे आंदोलन केले जात आहे.
या मागण्या मान्य करुन घेण्यासाठी सोमवारी हरियाणा आणि पंजाबच्या सीमेवर शेतकऱ्यांची महापंचायत आयोजित करण्यात आली होती. या पंचायतीत आंदोलनाची रुपरेषा ठरविण्यात आली. त्यानंतर हजारो शेतकऱ्यांनी महामार्गाकडे वाटचाल करीत तो बंद केला, अशी माहिती प्रशासनाने दिली आहे.
हरियाणा सरकारने सूर्यफुलाचे उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी पहिला हप्ता म्हणून 29 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. ही रक्कम 8,528 शेतकऱ्यांमध्ये वाटण्यात येणार आहे. तथापि, ती कमी असल्याचा शेतकऱ्यांचा आक्षेप असून त्यासाठी हे आंदोलन होत आहे. सूर्यफूल बियांची खरेदी किमान आधारभूत किमतीपेक्षा कमी दरात झाल्यास शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल 1 हजार रुपये देण्याची राज्य सरकारची राज्य सरकारची योजना आहे. मात्र, शेतकऱ्यांचे म्हणणे सरकारनेच सर्व सूर्यफूल उत्पादनाची खरेदी किमान आधारभूत दराने करावी, असे आहे.
सूर्यफुलाची किमान आधारभूत किंमत केंद्र सरकारने 6,400 रुपये प्रतिक्विंटल इतकी निर्धारित केली आहे. मात्र, खासगी व्यापारी 4,000 रुपये प्रतिक्विंटल दराने खरेदी करत आहेत, अशी तक्रार उत्तर प्रदेशमधील शेतकऱ्यांनीही केली आहे. हरियाणातील आंदोलनात राष्ट्रीय महामार्ग बंद करण्यात येऊ नयेत. ते खुले राहिले पाहिजेत, असे आवाहन शेतकऱ्यांचे नेते राकेश तिकैत यांनी केले.
मुख्यमंत्र्यांची टीका
काही शेतकरी संघटना विनाकारण शेतकऱ्यांना आंदोलन करण्यासाठी प्रक्षुब्ध करीत आहेत. राज्य सरकारने त्यांच्या पीकांची खरेदी किमान आधारभूत किमतीला खरेदी केली असूनही ते राज्याबाहेर जाऊन अधिक दराने विक्री करण्याचा प्रयत्न करतात. त्यांना काही राजकीय नेत्यांची फूस आहे. या प्रश्नात राजकारण घुसडण्याचा प्रयत्न कोणीही करु नये, अशी टीका हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी केली. चर्चा करुन मार्ग काढण्याचे आवाहन त्यांनी केले.









