चिपळूण :
मिरजोळी-साखरवाडी बौद्धसमाज स्मशानभूमीजवळ पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमध्ये बुधवारी दोन वाहने अडकली. सुदैवाने कोणतीही दुर्घटना घडली नसली तरी अज्ञाताने रागापोटी खड्ड्यांमध्येच वृक्षारोपण केले. त्यानंतर राष्ट्रीय महामार्ग विभागाला जाग आली. यामुळे अधिकाऱ्यांनी गेले दोन दिवस येथे संबधित ठेकेदाराकडून डागडुजी करुन घेतली आहे. लवकरच येथे पेव्हर ब्लॉक बसवले जाणार आहेत.
मिरजोळी-साखरवाडी बौद्ध समाज स्मशानभूमी, लाईफकेअर बायपास येथे पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहनांना दरदिवशी अपघात होत आहेत. यामुळे मिरजोळी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीने स्वातंत्र्यदिनी उपोषण करण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर राष्ट्रीय महामार्ग विभागाने संबधित ठेकेदारांना हे खड्डे पेव्हर ब्लॉकने भरण्याचे आदेश दिले. त्यानुसार येथे पेव्हर ब्लॉक व अन्य साहित्य आणण्यात आले आहे. त्यामुळे उपोषण स्थगित करण्यात आले. यानंतर गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत असल्याने हे काम रखडले आहे.
मात्र मुसळधार पावसामुळे स्मशानभूमी परिसरात मोठमोठे खड्डे पडले असल्याने बुधवारी दुपारी त्यात कार व बोलेरो अशी दोन वाहने अडकली. ती एका बाजूला कलंडली होती. सुदैवाने मोठी दुर्घटना घडली नाही. तसेच येथे अन्य वाहनेही घसरत होती. त्यामुळे अज्ञाताने या खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करीत बाजूने पेव्हर ब्लॉक लावले. यामुळे मार्गावर मोठी वाहतूककोंडी झाली. याची माहिती मिळताच राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांसह संबधित ठेकेदाराच्या कर्मचाऱ्यांनी धाव घेत डागडुजी करण्याचे काम हाती घेतले. मात्र रोलर व अन्य यंत्रणा नसल्याने हे काम थांबवण्यात आले.
गुरुवारी सकाळी संपूर्ण यंत्रणा येथे लावून मोठमोठे खड्डे भरण्यात आले आहेत. मात्र अन्य खड्डे तसेच ठेवण्यात आल्याने ग्रामस्थांसह वाहनचालकांतून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. असे असले तरी येथे साठून राहणाऱ्या पाण्याला वाट मोकळी करून दिली असल्याने पाणी वाहते झाले आहे. दोन दिवसाचा पावसाचा जोर कमी झाला आहे. त्यामुळे लवकरच येथे पेव्हर ब्लॉक बसवले जाणार असल्याची माहिती राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.








