कडोली ग्रामपंचायत अध्यक्षांची माहिती : शाळेची नासधूस करणाऱ्यांवर कारवाईचा इशारा
वार्ताहर /कडोली
रात्रीच्यावेळी धुडगूस घालून शाळा इमारतींना नुकसान पोहोचविणाऱ्या आणि अस्वच्छता निर्माण करणाऱ्या समाजकंटकांवर चाप बसण्यासाठी हायमास्ट बसवून आमराईतील शाळा आवार उजेडात आणण्याचा आणि असे गैरकृत्य करणाऱ्या संबंधीतांवर पोलिसी कारवाई करण्याचा विचार असल्याचे कडोली ग्राम पंचायतीचे अध्यक्ष सागर मोहन पाटील यांनी सांगितले. कडोली गावच्या पश्चिमेला असलेल्या आमराईत मराठी, कन्नड आणि उर्दू प्राथमकि शाळा कार्यरत असून या शाळांना कायम टारगेट करून शाळा इमारतींना नुकसान पोहोचविणे, शाळा परिसरात अस्वच्छता निर्माण करणे, दरवाजे, खिडक्या मोडून शैक्षणिक साहित्याची चोरी करणे असे सर्रास प्रकार गेल्या अनेक वर्षापासून सुरू आहेत. या प्रकाराला तर स्थानिक शाळा प्रशासन वैगातून गेला होता. शिवाय शाळा परिसर म्हणजे दारू ढोसण्याचा अ•ाच बनविला गेला आहे. असे कृत्य करणाऱ्या समाजकंटकांनी तर प्राथमिक मराठी शाळेची पूर्वीची इमारत अवघ्या काही वर्षातच मोडकळीस आणली होती.
प्रसंगी पोलीस कारवाई करू!
शाळांना चोहोबाजूनी कंपाऊंड नाही. त्यामुळे संबंधीतांना याचा पुरेपूर लाभ मिळतो. रात्रीच्यावेळी हा प्रकार सर्रास चालू असतो. याबद्दल अनेक तक्रारी ग्रा. पं. ला कळविण्यात आल्या होत्या. पण कोणीच याची दखल घेतली नाही. पण आता नूतन अध्यक्ष सागर पाटील यांनी जातीने लक्ष घालण्याचा निर्णय घेतला असून प्रथमत: आमराईतील शाळा आवार उजेडात आणण्यासाठी हायमास्ट बसविणार असल्याचे सांगितले आहे. शिवाय इथून पुढे शाळेच्या आवारात गैरकृत्य करणाऱ्या समाजकंटकांवर बारकाईने लक्ष ठेवून प्रसंग पडल्यास त्यांच्यावर पोलिसी कारवाई करण्यास मागेपुढे पाहणार नाही. यासाठी लवकरच हे कार्य हाती घेणार असल्याचे सागर पाटील यांनी सांगितले.









