83 जणांनी मांडले गाऱ्हाणे, निपाणीतील गैरधंद्यांच्याही तक्रारी
प्रतिनिधी/ बेळगाव
जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. संजीव पाटील यांच्या फोन ईन कार्यक्रमाला शनिवारी संपूर्ण जिल्ह्यातून उत्तम प्रतिसाद मिळाला. आजच्या कार्यक्रमात तक्रारदारांनी सर्वाधिक तक्रारी नोंदविल्या. बेळगाव शहरातूनही वाहतुकीची कोंडी, पार्किंगच्या समस्यांसंदर्भात नागरिकांनी पोलीसप्रमुखांकडे आपले गाऱ्हाणे मांडले आहे.
शनिवार दि. 12 ऑगस्ट रोजी पोलीसप्रमुखांनी घेतलेला हा 17 वा फोन ईन कार्यक्रम होता. या कार्यक्रमात 83 जणांनी पोलीसप्रमुखांशी संपर्क साधून आपल्या समस्या मांडल्या. संपूर्ण जिल्ह्यातून 76 व बेळगाव शहरातून 7 अशा एकूण 83 जणांनी आपले गाऱ्हाणे मांडले असून आतापर्यंत पोलीसप्रमुखांकडे तक्रारी करणाऱ्यांची संख्या 1 हजार 053 वर पोहोचली आहे.
नेहमीप्रमाणे बेकायदा दारूविक्री, मटका, जुगार आदी गैरप्रकार थोपविण्यासंबंधी वेगवेगळ्या तालुक्यातील नागरिकांनी तक्रारी केल्या. खासकरून निपाणी शहरातील गांजाविक्री, मटका-जुगारावर आळा घालण्यासंबंधी मागणी करण्यात आली. चिकोडी येथील परिवहन मंडळाच्या बसस्थानकावर सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यासंबंधीही मागणी करण्यात आली. रायबाग तालुक्यातील चिंचली परिसरात रात्रीची गस्त वाढविण्याची मागणी करण्यात आली.
पोलीस व नागरिकांमधील दरी दूर करण्यासाठी पोलीस दलाकडून अनेक उपक्रम राबविले जातात. आता तर एफआयआर दाखल केल्यानंतर पोलीस स्थानकात पोलिसांकडून कशी वागणूक मिळाली, हे जाणून घेण्यासाठी तंत्रज्ञानाची मदत घेण्यात आली आहे. क्युआर कोड स्कॅन करून तक्रारदारांना आपली प्रतिक्रिया नोंदविता येते. तरीही पोलीस स्थानकात नागरिकांना सौजन्याची वागणूक मिळत नाही, अशी तक्रार हलगत्ती येथील एकाने केली.
मटका, जुगार, गांजा व बेकायदा दारूविक्रीसंबंधी अधिकाधिक तक्रारी आल्या. त्यानंतर पार्किंगची समस्या, भाऊबंदकी, बेपत्ता महिलेचा शोध घेणे, रात्रीची गस्त वाढविणे, वाहतुकीची कोंडी आदींबरोबरच आर्थिक व्यवहार, रस्ते, गटारीचे काम सुरू करणे, फुटलेल्या पाईपलाईनची दुरुस्ती करणे अशा तक्रारींचाही शनिवारी पाऊस पडला.









