टॉवरवर चढून केले आंदोलन
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
दिल्ली महापालिका निवडणुकीच्या घोषणेनंतर राजधानीमध्ये सर्व राजकीय पक्षांकडून स्वतःच्या उमेदवारांची घोषणा केली जता आहे. निवडणुकीदरम्यान उमेदवारी न मिळाल्याने नेत्यांची नाराजी दिसून येणे स्वाभाविक आहे. परंतु आम आदमी पक्षाचे पूर्व दिल्लीतील नगरसेवक राहिलेले हसीब उल हसन यांनी उमेदवारी न मिळाल्याने हायव्होल्टेज ड्रामा घडवून आणला आहे. माजी नगरसेवकाने स्वतःच्या कागदपत्रांची मागणी करत थेट टॉवरवर चढून पक्षाच्या विरोधात आंदोलन केले आहे.
या टॉवरची उंची अधिक आहे, परंतु माझ्या निर्धाराची उंची त्याहून अधिक आहे. पक्षासाठी मी दिवसरात्र मेहनत केली, आम आदमी पक्षाकडून मी उमेदवारीची मागणी करत नाही. मी केवळ स्वतःची कागदपत्रे मागत आहे. सोमवारी अर्ज भरता यावा म्हणून माझी कागदपत्रे परत करावीत. माझी कागदपत्रे न दिल्यास माझ्या मृत्यूसाठी आम आदमी पक्षाचे नेते दुर्गेश पाठक आणि आतिशी हे जबाबदार असतील असे हसन यांनी म्हटले आहे.
मार्च महिन्यात हसीब उल हसन हे नाल्यात उतरून सफाई करण्यावरून चर्चेत आले होते. नाल्याची सफाई झाल्यावर हसन यांना उपस्थित लोकांनी दूधाची आंघोळ घातली होती. या पूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.









