सौदी अरेबियात बोलणी : अमेरिकेचा पुढाकार
वृत्तसंस्था/ मॉस्को
रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध सोडविण्यासाठी मंगळवारी सौदी अरेबियात रशिया आणि अमेरिकेदरम्यान उच्चस्तरीय बैठक होऊ शकते. यामध्ये दोन रशियन अधिकाऱ्यांचा समावेश असेल. रशियाच्या राष्ट्राध्यक्ष कार्यालयाचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह यांनी याची पुष्टी केली आहे. दरम्यान, या शांतता चर्चेसाठी युक्रेनला आमंत्रित करण्यात आले नसल्याचा दावा केला जात आहे.
रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्गेई लावरोव्ह आणि पुतिन यांचे परराष्ट्र धोरण सल्लागार युरी उशाकोव्ह सोमवारी सौदीची राजधानी रियाधला रवाना झाल्याचे समजते. अमेरिकेच्या बाजूने परराष्ट्रमंत्री मार्को रुबियो आणि युक्रेन आणि रशियासाठीचे वॉशिंग्टनचे विशेष दूत कीथ केलॉग यात सहभागी होतील. रुबियो सोमवारी दुपारी रियाधला पोहोचले असून ते अमेरिकन शिष्टमंडळाचे नेतृत्व करतील. अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (एनएसए) मायकेल वॉल्ट्झ आणि विशेष दूत स्टीव्ह विटकॉफ हेदेखील बैठकीला उपस्थित राहू शकतात.
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांना युक्रेन युद्धावरील शांतता चर्चेसाठी आमंत्रित केलेले नाही. युक्रेनच्या एका वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याच्या हवाल्याने याची पुष्टी मिळाली आहे. यापूर्वी, अमेरिकेचे विशेष दूत कीथ केलॉग यांनी युक्रेनच्या सहभागाबद्दल भाष्य केले होते. युक्रेनला अद्याप चर्चेसाठी आमंत्रित केलेले नाही. युरोपीय देशांच्या नेत्यांनाही या चर्चेत सहभागी होण्यासाठी आमंत्रित केलेले नाही.









