गृहमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक ः आयबी अधिकाऱयांचा सहभाग
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी नवी दिल्लीमध्ये देशभरातील इंटेलिजेन्स ब्युरोच्या (आयबी) अधिकाऱयांची एक दिवसीय उच्चस्तरीय बैठक पार पडली आहे. या बैठकीत देशाच्या अंतर्गत सुरक्षेची स्थिती, दहशतवादाचा धोका तसेच केंद्रीय अन् राज्याच्या यंत्रणांमधील समन्वयाच्या आवश्यकतेवर मंथन झाले आहे.
गृहमंत्री अमित शाह यांनी बैठकीत दहशतवाद, अंतर्गत सुरक्षा, गोपनीय माहिता जमा करणाऱया नेटवर्कसमवेत अन्य पैलूंचा आढावा घेतला आहे. देशभरातील गुप्तचरसंबंधी मुद्दय़ांशी निगडित अनेक वरिष्ठ अधिकारी बैठकीत सामील झाले. तसेच केंद्रीय गृहसचिव अजय कुमार भल्ला आणि आयबी प्रमुख तपन डेका यांनीही या बैठकीत भाग घेतला आहे.
मागील महिन्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली सर्व राज्ये तसेच केंद्रशासित प्रदेशांच्या गृहमंत्र्यांचा सहभाग असलेले दोन दिवसीय चिंतन शिबिर हरियाणाच्या सूरजकूंडमध्ये पार पडले आहे. या चिंतन शिबिरात केंद्र आणि राज्य सरकारांदरम्यान अनेक मुद्दय़ांवर सहमती झाली आहे. यात बिहार अन् झारखंडला नक्षलवादमुक्त करणे, अंतर्गत सुरक्षेवर एकत्र काम करणे, सायबर गुन्हेगारी, दहशतवाद, अमली पदार्थांची तस्करी आणि अन्य गुन्हय़ांमध्ये सामील गुन्हेगारांना शिक्षा मिळवून देणे, फॉरेन्सिक तपासणी इत्यादींचा समावेश आहे. 2047 च्या योजनेंतर्गत केंद्र आणि राज्य सरकारांनी सहकार्यात्मक भूमिका अवलंबून एकत्र काम करावे असे या शिबिरात म्हटले गेले होते.









