मुख्यमंत्र्यांसह मंत्री, आमदार, अधिकाऱ्यांचा सहभाग
मडगाव : मडगाव पालिका क्षेत्रातील सोनसडा कचरा प्रकल्पासंदर्भात उच्चस्तरीय समितीची बैठक बरीच लांबणीवर पडली होती. या बैठकीची आठवण फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई यांनी करून दिल्याने ही बैठक आज सोमवारी पणजीत होत असल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल रविवारी मडगावात पत्रकारांशी बोलताना दिली. सोनसड्यावरील कचरा समस्या ही मडगाव नगरपालिकेसाठी सातत्याने डोकेदु:खी बनून राहिली आहे. सद्या उच्च न्यायालय सोनसडो कचरा प्रकल्पावर लक्ष ठेऊन आहे. सोनसडा कचरा प्रकल्पाची माहिती न्यायालयात सादर करावी लागते. त्यात उच्च स्तरीय समितीची बैठक झाली नव्हती. ही बैठक होणे महत्वाचे होते असे मुख्यमंत्री म्हणाले. बुधवारी आमदार विजय सरदेसाई यांनी पत्रकार परिषद घेतली होती. ही पत्रकार परिषद सुरू असतानाच, त्यांनी मुख्यमंत्र्याकडे भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला होता. त्यावेळी मुख्यमंत्री कार्यक्रमात व्यस्त असतानाही त्यांनी प्रतिसाद दिला होता. त्यामुळे आमदार विजय सरदेसाई व मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे ताणलेले संबंध सुधारले असावे, अशी चर्चा सासष्टीत होती. यावर मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रीया जाणून घेतली असता मुख्यमंत्री म्हणाले की, सोनसडा कचरा प्रश्न महत्वाचा आहे. उच्च स्तरीय समितीची बैठक बरेच दिवस झाली नव्हती. तिची आठवण आमदार विजय सरदेसाई यांनी करून दिली. बैठकीची आठवण करून देण्यापलिकडे विशेष काही नसल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. आज मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखाली उच्च स्तरीय समितीची बैठक होईल. या बैठकीला आरोग्यमंत्री विश्वजित राणे, आमदार दिगंबर कामत, आमदार विजय सरदेसाई, आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स, नगराध्यक्ष दामोदर शिरोडकर, राज्याचे मुख्यसचिव तसेच इतर सरकारच्या इतर खात्याचे सचिव, दक्षिण गोव्याचे जिल्हाधिकारी, सार्वजनिक बांधकाम खात्याचे प्रधान अभियंते इत्यादी उपस्थित राहणार आहेत.








