उच्च न्यायालयाची कठोर टिप्पणी
वृत्तसंस्था/ कोलकाता
कोलकात्यातील आरजी कर मेडिकल कॉलेजचे माजी प्राचार्य संदीप घोष यांच्या याचिकेवर सुनावणी करत कलकत्ता उच्च न्यायालयाने उच्चपातळीवरील भ्रष्टाचारामुळे जनतेच्या विश्वासावर गंभीर प्रभाव पडत असल्याची टिप्पणी केली आहे. घोष यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल करत स्वत:च्या विरोधात नोंद आर्थिक अनियमिततेचे प्रकरण फेटाळण्याची मागणी केली आहे.
ज्या विशेष न्यायालयासमोर घोष यांच्या प्रकरणाची सुनावणी होणार आहे, ते उच्च न्यायालयात याप्रकरणाच्या पुढील सुनावणीपूर्वीची तारीख निश्चित करू शकते असे न्यायाधीश जॉयमाल्या बागच आणि गौरांग कांत यांच्या खंडपीठाने म्हटले आहे.
संदीप घोष आणि अन्य 4 जणांना आरजी कर मेडिकल कॉलेजमधील आर्थिक अनियमिततेप्रकरणी अटक केली होती. प्राचार्य असताना मेडिकल कॉलेजच्या व्यवस्थापनात वित्तीय अनियमितता झाल्याचा आरोप घोष यांच्यावर आहे. याचिकाकर्त्याच्या विरोधात झालेले आरोप अत्यंत गंभीर आहेत. उच्चपातळीवरील भ्रष्टाचारामुळे जनतेचा शासनावरील विश्वास खालावतो. भ्रष्टाचार प्रकरणी आरोपीच्या विरोधात सुनावणीमुळे लोकांचा न्यायव्यवस्थेवरील विश्वास कायम राहणार आहे. याचबरोबर कोठडीत असलेल्या आरोपीला निष्पक्ष आणि न्यायपूर्ण सुनावणीचा अधिकार असल्याचे खंडपीठाने म्हटले आहे. उच्च न्यायालयाने मंगळवारी सुनावणीदरम्यान सीबीआयला तपास अहवाल सादर करण्याचा निर्देश दिला. तसेच इलेक्ट्रॉनिक आणि स्कॅन दस्तऐवजांच्या प्रती आरोपींना उपलब्ध करविण्यास सहमती दिली आहे.









