महापौर मंगेश पवार-नगरसेवक जयंत जाधव यांना दिलासा : पुढील सुनावणी सोमवारी
बेळगाव : खाऊकट्टा प्रकरणी प्रादेशिक आयुक्तांनी अपात्र ठरविल्याने महापौर मंगेश पवार आणि नगरसेवक जयंत जाधव यांनी सोमवारी बेंगळूर उच्च न्यायालयात रिटपिटीशन दाखल केली होती. त्यावर न्यायालयाने मंगळवारी अपात्रतेच्या निर्णयाला स्थगिती दिली असून याप्रकरणी पुढील सुनावणी सोमवार दि. 7 रोजी होणार आहे. गोवावेस येथील खाऊकट्ट्यामधील गाळे मंगेश पवार व जयंत जाधव यांनी आपल्या पत्नींच्या नावे घेतल्याने समाजसेवक सुजित मुळगुंद यांनी प्रादेशिक आयुक्तांकडे तक्रार दिली होती. त्यानुसार प्रादेशिक आयुक्तांनी याप्रकरणी सुनावणी घेत दोघांनाही अपात्र ठरविले होते. त्यामुळे प्रादेशिक आयुक्तांच्या निर्णयाला स्थगिती मिळावी, यासाठी यापूर्वी उच्च न्यायालयात दाद मागितली होती.
त्यावेळी प्रादेशिक आयुक्तांच्या निर्णयावर पुन्हा एकदा सुनावणी घेऊन निर्णय द्यावा, अशी सूचना उच्च न्यायालयाने नगरविकास खात्याला दिली होती. त्याचबरोबर दोघांनी नगरविकास खात्याकडे दाद मागितल्याने सचिव दीपा चोळण यांनी सुनावणी घेत प्रादेशिक आयुक्तांचा निर्णय अंतिम ठेवत गुरुवारी दोघांचाही अर्ज फेटाळल्याने ते पुन्हा अपात्र ठरले होते. लागलीच तक्रारदार सुजित मुळगुंद यांच्यावतीने काम पाहणारे अॅड. नितीन बोलबंडी यांनी धारवाड आणि बेंगळूर उच्च न्यायालयात कॅव्हेट दाखल केले होते. तर दोघा नगरसेवकांनीदेखील प्रादेशिक आयुक्तांच्या निर्णयाला स्थगिती मिळावी यासाठी सोमवारीच रिटपिटीशन दाखल केली होती. उच्च न्यायालयाने प्रादेशिक आयुक्तांच्या निर्णयाला मंगळवारी स्थगिती दिली असून याप्रकरणी पुढील सुनावणी सोमवार दि. 7 रोजी होणार आहे. न्यायालयाच्या या स्थगितीच्या निर्णयामुळे महापौर मंगेश पवार आणि नगरसेवक जयंत जाधव यांना दिलासा मिळाला आहे.









