‘सरबत जिहाद’च्या सर्व जाहिराती हटविणार
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
योगगुरु आणि पतंजलि आयुर्वेदचे संस्थापक बाबा रामदेव यांनी मंगळवारी दिल्ली उच्च न्यायालयाला ‘हमदर्द’च्या रुह अफजावरील स्वत:च्या कथित ‘सरबत जिहाद’च्या टिप्पणीशी संबंधित व्हिडिओ आणि सोशल मीडिया पोस्ट त्वरित हटविण्याचे आश्वासन दिले आहे. तर त्यापूर्वी उच्च न्यायालयाने बाबा रामदेव यांची टिप्पणी अयोग्य असल्याचे म्हणत त्यांना फटकारले होते.
स्वत:च्या ब्रँडच्या सरबताचा प्रचार करत बाबा रामदेव यांनी ‘हमदर्द’च्या रुह अफजापासून मिळणाऱ्या उत्पन्नाचा वापर मदरसा आणि प्रार्थनास्थळ उभारण्यासाठी करत असल्याचा दावा केला होता असे हमदर्दच्या वकिलाने उच्च न्यायालयाला सांगितले. यानंतर बाबा रामदेव यांनी स्वत:च्या टिप्पणीचा बचाव करत कुठल्याही ब्रँड किंवा समुदायाचे नाव घेतले नसल्याचा युक्तिवाद केला होता.
रामदेव यांच्या ब्रँडच्या विरोधात ‘हमदर्द नॅशनल फौंडेशन इंडिया’च्या याचिकेवर सुनावणी करत असलेले न्यायाधीश अमित बंसल यांनी या टिप्पणीमुळे धक्का बसला, ही टिप्पणी पूर्णपणे चुकीची आहे, याप्रकरणी चूक मान्य न केल्यास कठोर आदेश देऊ असे म्हटले.
हे प्रकरण अपमानापेक्षाही मोठे आहे. ही टिप्पणी सांप्रदायिक विभाजन निर्माण करणारी आहे असे हमदर्दचे प्रतिनिधित्व करणारे वरिष्ठ अधिवक्ते मुकुल रोहतगी यांनी म्हटले आहे. तर सुनावणीवेळी बाबा रामदेव यांच्या वकिलाने वादग्रस्त वक्तव्यांशी संबंधित सर्व मुद्रित किंवा व्हिडिओ प्रारुपाच्या जाहिराती आणि सोशल मीडिया पोस्ट त्वरित हटविण्यात येणार असल्याचे न्यायालयासमोर म्हटले आहे.
बाबा रामदेव यांनी भविष्यात प्रतिस्पर्ध्यांच्या उत्पादनांशी संबंधित अशाप्रकारचे वक्तव्य, जाहिरात किंवा सोशल मीडिया पोस्ट जारी न करणार नसल्याचे प्रतिज्ञापत्र 5 दिवसांच्या आत सादर करावे असा निर्देश न्यायालयाने दिला आहे. याप्रकरणी पुढील सुनावणी आता 1 मे रोजी होणार आहे.









