‘आर एल लॉ’तर्फे आयोजन : कॉलेजचे अनेक विद्यार्थी विविध न्यायालयात न्यायाधीश
प्रतिनिधी / बेळगाव
कर्नाटक लॉ सोसायटीच्या राजा लखमगौडा लॉ कॉलेजतर्फे कॉलेजचे पाच माजी विद्यार्थी जे सध्या कर्नाटक उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून कार्यरत आहेत, त्यांचा सत्कार शनिवार दि. 5 ऑगस्ट रोजी सायंकाळी 4.30 वाजता सोसायटीच्या के. के. वेणुगोपाल सभागृहात होणार आहे. अध्यक्ष म्हणून सोसायटीचे अध्यक्ष ॲड. अनंत मंडगी उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती सोसायटीचे सचिव ॲड एस. व्ही. गणाचारी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
ते म्हणाले, आर. एल. लॉ कॉलेज हे माजी विद्यार्थ्यांच्या कर्तृत्वामुळे ओळखले जात आहे. या कॉलेजमध्ये शिक्षण घेतलेले दोन विद्यार्थी सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश ई. एस. वेंकटरामय्या व राष्ट्रीय मानव हक्क आयोगाचे माजी चेअरपर्सन डॉ. एस. राजेंद्रबाबू यांनी कॉलेजचे नाव उंचावले आहे. याशिवाय याच कॉलेजमधून शिक्षण घेतलेले विद्यार्थी आज अनेक न्यायालयांमध्ये न्यायाधीश म्हणून काम करत आहेत.
त्यांच्यापैकी महत्त्वाची नावे म्हणजे न्यायाधीश कै. व्ही. एस. मलीमठ, न्या. एस. आर. बन्नूरमठ, पद्मविभूषण के. के. वेणुगोपाल हेसुद्धा कॉलेजचे माजी विद्यार्थी आहेत. या कॉलेजचे अनेक विद्यार्थी संसदपटूसुद्धा आहेत. त्याशिवाय कै. बी. एन. दातार, एस. आर. बोम्माई, जे. एच. पटेल, कै. बी. शंकरानंद, कै. सरोजिनी महिषी यांनीही याच कॉलेजमध्ये शिक्षण घेऊन उत्तम कामगिरी बजावली आहे. राष्ट्रीय क्रीडापटू अर्जुन देवय्या, अभिनेते चारू हासन या माजी विद्यार्थ्यांनीसुद्धा कॉलेजचे नाव मोठे केले आहे. कायद्याचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करणे आणि माजी विद्यार्थ्यांच्या कर्तृत्वाच्या नोंदी घेणे, या हेतूने हा सत्कार होत असल्याचे त्यांनी सांगितले.
शनिवारी होणाऱ्या समारंभात कर्नाटक उच्च न्यायालयाचे न्यायाधीश प्रसन्ना वराळे यांच्या हस्ते न्या. सचिन शंकर मगदूम, न्या. रवि वेंकप्पा होसमनी, न्या. के. एस. हेमलेखा, न्या. अनिल भीमसेन कट्टी, न्या. रामचंद्र हुद्दार या पाच माजी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. ॲड. अनंत मंडगी यांच्या हस्ते न्या. प्रसन्ना वराळे यांचा सत्कार करण्यात येणार आहे.
कार्यक्रमास सोसायटीचे सर्व सदस्य, वकील व विविध न्यायालयांचे न्यायाधीश, कायदा कॉलेजचे विद्यार्थी उपस्थित राहणार आहेत, असे ॲड. मुतालिक यांनी सांगितले. पत्रकार परिषदेस सोसायटीचे चेअरमन एम. आर. कुलकर्णी, प्रा. समीना बेग व प्राचार्य हवालदार उपस्थित होते.









